Shankaracharya Vijayendra Saraswathi visit Mumbai
नवी मुंबई : तामीळनाडूतील श्री कांची कामकोटी पीठमचे श्री शंकराचार्य वीजयेंद्र सरस्वती आपली विजययात्रा घेऊ बुधवारी नवी मुंबईत दाखल झाले. 30 नोव्हेंबरपर्यंत ते मुंबईत असतील आणि त्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कांची कामकोटी पीठमचे 70 वे शंकराचार्य म्हणून वीजयेंद्र सरस्वती यांनी सात वर्षांपूर्वी सूत्रे स्वीकारली. तेव्हापासून ते प्रथमच मुंबई दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी तिरूपतीहून विशेष विमानाने ते मुंबईत पोहोचले आणि नवी मुंबईत नेरूळमधील साऊथ इंडिया एज्युकेशन सोसायटीच्या (एसआयईएस) संकुलात ते मुक्कामी पोहोचले. या वास्तव्यातील त्यांचा पहिलाच कार्यक्रम म्हणून अनेक शाळांच्या 1500 मुलांनी त्यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचे पठन केले.
गुरुवारी एसआयईएस संकुलातच सकाळी 11 ते 12 दरम्यान 33 फूट उंच श्री हनुमानाच्या मूर्तीला महाकुंभाभिषेकम करण्यात येईल. यावेळी वेदपाठशाळेचे 200 विद्यार्थी चतुर्वेद पारायण करतील. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस म्हणजे 28 व 29 नोव्हेंबरला शंकराचार्य वीजयेंद्र सरस्वती मुंबईत माटुंग्याच्या श्री शंकर मठात असतील.
शुक्रवारी शंकराचार्य सकाळी 6 वाजता महालक्ष्मी मंदिरात जातील. त्यानंतर8 वाजता श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील. त्यानंतर श्री आस्तिक समाजाला भेट दिल्यानंतर ते सव्वा दहा वाजता माटुंग्याच्या श्री शंकर मठात पोहोचतील. शुक्रवारी दुपारी 3 वाजता टाटा सन्सचे चेअरमन पद्मभूषण एन. चंद्रशेखरन शंकराचार्यांची भेट घेणार आहेत. सायंकाळी दक्षिण भारतीय भजन समाज, कनिका परमेश्वरी मंदीर, मारूबाई गावदेवी मंदिराला भेट देऊन सव्वा सात वाजता शंकराचार्य शंकर मठात परततील.
शनिवारी 29 नोव्हेंबरला सकाळी चेंबूरच्या अहोविला मठाला शंकराचार्य भेट देतील. त्यानंतर छेडानगरातील श्री सुब्रह्मणी समाज, घाटकोपरचा भजन समाजाला भेट देऊन शंकराचार्य साडे दहा वाजता शंकर मठात परततील. सायंकाळी 5 वाजता शंकराचार्यांच्या उपस्थितीत श्री षण्मुखानंदमध्ये गुरू वंदना समारोह आयोजित करण्यात आला आहे. रविवारी 30 नोव्हेंबरला शंकराचार्य मुंबईहून पुण्याला रवाना होतील.
शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्या या विजय यात्रेला विशेष महत्त्व आहे. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उद्देशाने शंकराचार्य विजय यात्रेला निघतात. सनातन धर्माचा प्रसार, अद्वैत वेदांताचा संदेश सर्वदूर पसरवणे आणि कुंभाभिषेकमसारखे धार्मिक विधी करणे त्याचबरोबर आपल्या श्रद्धाळूंना आशीर्वाद देण्यासाठी हे विजय यात्रा काढली जाते.