Shankaracharya Avimukteshwaranand On Court Decisions
मुंबई : न्यायालयाला धार्मिक गोष्टींबाबत दूरदृष्टी आणि समज नाही, त्यामुळे न्यायालयाने इतर न्याय निवाडा करावा, पण धार्मिक गोष्टीत पडू नये, असे परखड मत ज्योतिषपीठाधिश्वर, विद्यमान शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले आहे. आम्ही धर्म निर्णयालयाची स्थापना करत आहोत, आमच्या न्यायालयात न्याय निवाडा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, न्यायालयाला धर्माच्या छोट्या-छोट्या गोष्टी कळत नाहीत. यापूर्वी तिरुपती प्रसादात विशिष्ट पदार्थ मिसळला जातो म्हणून काही लोक सुप्रीम कोर्टात गेले होते. पण कोर्टाने याचिका मागे घेण्यास सांगितलं. याचिका मागे घेताना न्यायालयाने टिपणी केली की, गाय ही गाय असते. गाईमध्ये भेदभाव का करता. देशी गाई या खूप मजबूत आहेत. दुधात भेदभाव आहे, मग गाईमध्ये का नाही? दूध कुत्र्याचे पण होते. तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे, अशा शब्दात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
राज्य सरकारने कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे कारण देत बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) शहरातील कबुतरखाना बंद करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने कारवाई सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शंकराचार्य म्हणाले की, "कबुतर जंगलात पण खाऊ शकतो. पण, आपण त्याला दाणे टाकण्याची सवय लावली. आता कबुतरखाने बंद करण्याची घोषणा केली आहे. आम्ही त्यावर याचिका दाखल केली आहे. १५ दिवसात त्यावर सुनावणी होईल."
महाराष्ट्र सरकारने गायीला ‘राजमाता’ म्हणून घोषित केले असले तरी त्यासाठी कोणताही अधिकृत प्रोटोकॉल लागू करण्यात आलेला नाही, यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “सरकारने घोषणा केली, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आम्ही यावर सरकारशी चर्चा करू,” असे ते म्हणाले.