मुंबई : शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आला आहे. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा भ्रष्ट कारभार, अनियमितता, बोगस अॅपच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक लूट अशा विविध कारणांमुळे शनिशिंगणापूर देवस्थान काही महिन्यांपासून वादात अडकले आहे. अखेर, राज्य सरकारने देवस्थानच्या कारभारासाठी व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय केला आहे.
ही समिती गठित होईपर्यंत अंतरिम प्रशासक म्हणून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकार्यांंकडे कारभार सोपविण्यात आला आहे. सोमवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. दरवर्षी देशभरातून येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, देवस्थानचा कारभार पाहणार्या श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा कारभार हा वर्षभरापासून वादाच्या भोवर्यात अडकला आहे. देवस्थानच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्या.
दर्शनासाठी बनावट अॅपद्वारे भाविकांकडून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याची बाब तर विधिमंडळातही चर्चेला आली होती. पावसाळी अधिवेशनात यावरून मोठे रणकंदनही झाले होते. अखेर या प्रकरणात भ्रष्ट विश्वस्तांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले होते.
येथील अनियमिततेचा पोलीस प्रशासन आणि धर्मादाय यंत्रणेमार्फत तपास सुरू होता. या काळातच देवस्थानच्या उप कार्यकारी अधिकार्याच्या आत्महत्येची घटना पुढे आली. त्यामुळे विश्वस्त मंडळाच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मंदिर व्यवस्थापनाची ही स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आता विश्वस्त मंडळाच्या जागी व्यवस्थापन समितीकडे मंदिराचा कारभार सोपविण्याचा निर्णय केला आहे. त्यासाठी श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.