Balasaheb Thackeray Photo Controversy
मुंबई : सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करण्यात आला असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आज (दि. १८) पुस्तकातील पाने फाडून निषेध केला. यावेळी प्रवक्त्या शायना एनसी यांनी पुस्तकाची पाने आणि सोनिया गांधी यांचा फोटो फाडताना तावातावात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान घडलेला हा प्रकार समोर आला आहे. शायना एनसी यांनी नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. "मी मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला. बाळासाहेबांचा फोटो फाडला नाही. वीर सावकरांचा अभद्र उल्लेख केल्याने सोनिया गांधींच पुस्तक फाडलं. तस उद्धव ठाकरे सेना हे पुस्तक फाडणार का?" असा सवाल त्यांनी केला आहे.
'एकीकडे काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश शासकांकडून होणारे हल्ले आणि तुरुंगवास सहन करत होते, तर दुसरीकडे विनायक दामोदर सावरकरांसारखे आरएसएसचे ज्येष्ठ विचारवंत आपल्या वसाहतवादी सत्ताधाऱ्यांकडे दयेचे अर्ज लिहित होते आणि त्यांचे सदस्य खबऱ्यांच्या रूपात ब्रिटिश अधिकाऱ्यांशी संगनमत करत होते. आरएसएसने नेहमीच काँग्रेस आणि तिच्या मूल्यांना, इतर धर्माच्या लोकांना दुय्यम नागरिक बनवणाऱ्या हिंदू राष्ट्राच्या आपल्या रचनेतील मुख्य अडथळा मानले होते. त्यांच्या प्रमुख विचारवंतांनी, त्यांच्या लिखाणात आणि भाषणांमध्ये, हिटलर आणि अल्पसंख्याकांसंबंधीच्या त्याच्या धोरणांबद्दल आपली प्रशंसा व्यक्त केली होती. काँग्रेसने नेहमीच असे मानले होते की त्यांची विभाजनवादी, प्रतिगामी आणि हुकूमशाही विचारसरणी देशाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण करेल.'
या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा असा उल्लेख का करण्यात आला? असा प्रश्न शिदेंच्या शिवसेनेच्या प्रवकत्या शीतल म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी हे पुस्तक स्वीकारले आहे का? हा सावरकरांचा अपमान नाही तर जनतेचा अपमान आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जसे जोडे मारले होते तसे उद्धव ठाकरे मारणार का? बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत काल एकही काँग्रेस कार्यकर्त्याने ट्वीट सुद्धा केले नाही, मग तुम्ही आता काय करणार? असा सवाल म्हात्रे यांनी केला आहे.
भाजपने शायना एनसी यांच्या पुस्तकाला कव्हर घालण्याची गरज नाही. त्या शिंदेसेनेतील फिरते चषक आहे. माफी मागुन काही होणार नाही, राजीनामा घ्या, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.