कांदिवली : पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून उद्यान परिसरातील झोपडीधारकांनी संजय गांधी उद्यान प्रशासनाविरोधात बुधवारी धडक मोर्चा काढला होता. या वेळी उद्यानाबाहेर मोठी गर्दी झाली होती.  (छाया : मृगेश बांदिवडेकर)
मुंबई

Mumbai Slum Rehabilitation : आम्ही मुंबई सोडणार नाही, आमचे पुनर्वसन मुंबईतच करा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील झोपडीधारकांची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

कांदिवली : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील कष्टकरी, झोपडीधारक, आदिवासी कुटुंबांचे कल्याणमधील खोणी व पनवेल येथील शिरढोण येथे पुनर्वसन करण्याच्या झोपडीधारकांनी विरोध दर्शविला. रोजगार, मुलांचे शिक्षण, आरोग्य सुविधा आणि उपजीविकेचा प्रश्न उपस्थित करत ‘आम्ही मुंबई सोडणार नाही, आमचे पुनर्वसन मुंबईतच करा,’ अशी भूमिका झोपडीधारकांनी बुधवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाविरोधात काढलेल्या मोर्चावेळी व्यक्त केली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांच्यावर दडपशाही आणि दमदाटीचे आरोप करत वनविभागाने शिरढोण आणि खोणी येथील पुनर्वसनाचा प्रस्ताव मागे घेतला नाही, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांना सोबत घेऊन तीन रेल्वेगाड्या भरून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धडक देऊन तेथे आमरण उपोषण करू, असा इशारा दिला.

या आंदोलनामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचेही पाहायला मिळाले. आंदोलनामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. उद्यानच्या गेटवर पोलिसांनी तीन लेयर बॅरिकेटिंग केली. मोठ्या संख्येत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तरीसुद्धा पहिला लेयर तोडून आंदोलन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बसले. यावेळी ‘जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची’, ‘आधी पुनर्वसन मगच विस्थापन’, ‘वन अधिकाऱ्यांची दादागिरी नाही चालणार’ अशा आशयाचे बॅनर यावेळी आंदोलकांकडून झळकावण्यात आले.

६,५०० सदनिकांची प्रक्रिया सुरु

मालाड ते दहिसर परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगतच्या वनक्षेत्रात अनेक वर्षांपासून हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वनविभागाने म्हाडाकडून कल्याणमधील शिरढोण आणि खोणी परिसरातील सुमारे ६,५०० सदनिका उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT