Women Molested In Mumbai
महिलेवर चाकू हल्ला करणार्‍या सुरक्षारक्षकाला बिहारहून अटक Pudhari File PHoto
मुंबई

महिलेवर चाकू हल्ला करणार्‍या सुरक्षारक्षकाला बिहारहून अटक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केअरटेकर म्हणून काम करणार्‍या एका ३८ वर्षांच्या महिलेवर चाकूने हल्ला करुन पळून गेलेल्या आरोपी सुरक्षारक्षकाला मालवणी पोलिसांच्या विशेष पथकाने बिहारहून अटक केली. प्रकाशकुमार योगिंदरकुमार मांझी असे या २८ वर्षांच्या सुरक्षारक्षकाचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून प्रकाशकुमारने या महिलेवर चाकूने हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

प्रकाशकुमार आणि तक्रारदार महिला मालाडच्या मढ परिसरात राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहे. ही महिला मढच्या व्यासवाडी, शास्वत फिल्म प्रोडेक्शन हाऊसमध्ये केअरटेकर म्हणून काम करते तर प्रकाशकुमार हा तिथे असलेल्या बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सोमवारी दुपारी त्याने तिला मांजरीचा बहाणा करुन बंगल्यामध्ये बोलाविले होते. तिथे त्याने तिच्याशी अश्‍लील लगट करुन तिचा विनयभंग केला. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने तिच्यावर चाकूने वार केले होते. त्यात तिच्या मानेला आणि पोटाला दुखापत झाली होती. ही माहिती महिलेकडून समजताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले. घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगून तिने प्रकाशकुमारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. प्रकाशकुमार हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. तो बिहारचा रहिवाशी होता, हल्ल्यानंतर तो बिहारला पळून जाण्याची शक्यता होती, त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बिहारला पाठविण्यात आले होते. बिहारला प्रकाशकुमार हा त्याच्या बहिणीकडे लपून बसला होता, तिथे पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर गुरुवारी दुपारी त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

SCROLL FOR NEXT