मुंबई : मुंबईतील काँक्रीट रस्ते कामांच्या दर्जाबाबत वारंवर तक्रारी येत असल्याने महापालिका प्रशासनाने आता दोन स्लम्प टेस्ट बंधनकारक केल्या आहेत. रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्पस्थळ (आरएमसी प्लांट) आणि प्रत्यक्ष कार्यस्थळ (ऑन फिल्ड) या दोन्ही ठिकाणी ही तपासणी करण्यात येणार आहे.
यामुळे कंत्राटदारांची चालूगिरी थांबणार असून काँक्रिटीकरणाची कामे आता दर्जात्मक होणार असल्याचा दावा महापालिकेच्या रस्ते विभागाकडून केला जात आहे.रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्पस्थळी जेवढा स्लंप आढळला त्यापेक्षा जास्त स्लम्प प्रत्यक्षस्थळी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आढळला होता.
याबाबत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) च्या तज्ज्ञांचे मत घेऊन काँक्रिटीकरणासाठी आलेले मिश्रण नाकारण्यात आले होते. याची गंभीर दखल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी घेत आता दोन्ही ठिकाणी ही तापसणी बंधनकारक केली आहे.
काय आहे स्लम्प टेस्ट
काँक्रीटच्या कार्यवहन क्षमतेसाठी स्लम्प टेस्ट करण्यात येते. याचा उपयोग काँक्रीटमध्ये सिमेंट व पाण्याचे प्रमाण किती, हे मोजण्यासाठी केला जातो. रस्ते बांधणी कामात स्लम्प टेस्ट ला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे काँक्रीटची गुणवत्ता तपासण्यासाठी होत पालिका प्रशासनाने रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्पस्थळ (आरएमसी प्लांट) आणि प्रत्यक्ष कार्यस्थळ (ऑन फिल्ड) या दोन्ही ठिकाणी स्लम्प टेस्ट बंधनकारक केली आहे.
परिपत्रक जारी
रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्पस्थळ (आरएमसी प्लांट) ते प्रत्यक्ष कार्यस्थळ या दरम्यान मिक्सर वाहन येईपर्यंत 30 ते 90 मिनिटांचा कालावधी लागू शकतो. या वाहतूक कालावधीचा विचार करता कंत्राटदारांनी तीन काँक्रीट मिक्स डिझाईन बनवून घ्याव्यात. आरएमसी प्लांटवरून वाहन निघून ते कार्यस्थळी पोहोचण्याचा कालावधी गुगलवर तपासून घ्यावा आणि त्या आधारावर कोणते काँक्रीटमिक्स डिझाईन वापरावे, याची निश्चिती करण्याचे निर्देश दिले. तसे अधिकृत परिपत्रक महापालिकेने जारी केले आहे.