कांदिवली: विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य ठरावीक दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर आता कारवाई होणार आहे. राज्यातील सर्व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अशा सक्तीपासून दूर राहण्याचे स्पष्ट निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यातील सर्व खासगी शाळा शैक्षणिक साहित्य आणि गणवेश ठरावीक दुकानातून खरेदी करा, असे पालकांना सांगतात. याबाबत अनेक पालकांनी, पालक संघटनांनी आणि ग्लोबल पेरेंट्स टीचर्स असोसिएशनने शिक्षण विभागाला तक्रारी केल्या होत्या.
याबाबत शासनाने निर्णय घेऊन परिपत्रक काढले आहे. या निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाने नव्याने परिपत्रक जारी करत सर्व शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. पालकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ चौकशी करून संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे.
मान्यताप्राप्त पाठ्यपुस्तकांनाच परवानगी
कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांवर विशिष्ट खासगी प्रकाशनांची पुस्तके खरेदी करण्याचेही बंधन घालू नये, असेही आदेशात नमूद आहे. राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसई शाळांनी मान्यताप्राप्त पाठ्यपुस्तकेच वापरावीत, असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पालकांना शैक्षणिक साहित्य खरेदीत मोकळीक मिळणार असून शाळांकडून होणाऱ्या आर्थिक सक्तीला आळा बसणार आहे.