मुंबई : शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती आता स्मार्ट अटेंडन्स बॉट या मोबाईल अॅपवरून नोंदवणे सक्तीचे केले आहे. शासकीय अनुदानित तसेच स्थानिक स्वायत्त संस्थांच्या शाळांसाठी हा आदेश लागू असून १ ऑक्टोबरपासून तो बंधनकारक करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शिक्षकांचे काम सुकर होणार की नव्या तांत्रिक अडचणी निर्माण होणार, याबद्दल शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.
शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी (दि.३०) परिपत्रक काढून राज्यातील सर्व शासकीय शाळांतील शिक्षकांना 'स्विफ्ट चॅट अॅप्लिकेशन' वरील स्मार्ट अटेंडन्स बॉट वापरून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवणे सक्तीचे केले आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपल्या शालार्थ आयडी आणि यू-डायस कोड वापरून लॉगिन करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या नव्या प्रणालीमुळे पारदर्शकता व कार्यक्षमता वाढेल असाविश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला असला परंतु याबात शिक्षक मात्र साशंक आहेत, या प्रणालीसाठी अनेक ऑनलाइन संदर्भात अडचणी येणार असल्याचे शिक्षकांचा सूर आहे. कारण दुर्गम भागांमध्ये नेटवर्कची अडचण अजूनही मोठी आहे.
राज्य मुख्याध्यापक संघटनेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले म्हणाले, ऑनलाइन उपस्थिती नोंदवणे योग्य आहे, पण त्यामुळे एकाच माहितीच्या तीन हार्ड कॉपी सादर करण्याची गरज संपणार का? चॅटबॉटवर उपस्थिती नोंदवल्यानंतरही शुल्कमाफीसाठी ७५ टक्के उपस्थितीचा अहवाल आता मागितला जाणार नाही का? शाळांना मासिक किंवा वार्षिक उपस्थिती अहवाल प्रगती पुस्तकासाठी मिळणार का? जर तसे नसेल तर हे योग्य होईल अन्यथा या कामामुळे शिक्षकांचे दुहेरी काम होणारच आहे असेही ते म्हणाले.
काही शिक्षकांनी म्हटले आहे की, हा उपक्रम उपयुक्त आहे, पण त्यात अजून सुधारणा होणे गरजेचे आहे. जोपर्यंतशिक्षण विभागाकडून खात्री मिळत नाही तो पर्यंत शाळांना नोंदवहीत नोंद करावीच लागणार आहे. अचानक अॅप बंद पडला तर माहिती कोढून मिळवायची हा प्रश्न आहे. पुन्हा तेच काम करावे लागणार आहे. यामुळे आता हे एक अतिरिक्त काम शिक्षकांना असणार आहे. उपस्थिती ऑनलाइन नोंदवूनही जर शाळांना अजूनही हार्ड कॉपी, स्वतंत्र अहवाल किंवा प्रगती पुस्तकासाठी वार्षिक हजेरीची मागणी केली गेली, तर शिक्षकांचे काम दुप्पट होईल. शासनाने याबाबत स्पष्टता न दिल्यास तोपर्यंत हा उपक्रम शिक्षकांसाठी 'सोय' की 'अडचण', हे सांगणे कठीण असेही काही शिक्षकांनी माहिती देताना सांगितले.
दोन सत्रे असलेल्या शाळांनी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत उपस्थिती अपलोड करावी लागेल. इतर शाळांनी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. इंटरनेट खंडित झाल्यास उपस्थिती दिवसभरात किंवा नंतरही भरता येणार आहे. पहिले दोन महिने शिक्षकांना ऑनलाइन उपस्थितीबरोबरच पारंपरिक रजिस्टरही ठेवावे लागतील. त्यानंतर अधिकृत नोंदीसाठी पीडीएफ डाउनलोडचा पर्याय उपलब्ध केला जाईल, ज्यामुळे मॅन्युअल रजिस्टरची गरज संपणार आहे. जर शिक्षकांना तांत्रिक अडचणी आल्या, तर ते तात्पुरते दुसऱ्या शिक्षकाचा शालार्थ आयडी वापरू शकतात, तोपर्यंत शालार्थ आणि यू-डायस पोर्टलवरील सुधारणा पूर्ण होतील. याबाबत अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हा व विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांना या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दररोजची अंमलबजावणी तपासली जाईल तसेच दरमहा पुनरावलोकन बैठकीत शाळांची शिस्तपालन स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.