

डोंबिवली: कल्याण शहरातील जुनी आणि प्रसिध्द श्रीमती के. सी. गांधी शाळेने शाळेतील विद्यार्थीनींना कपाळाला टिकली, हातात बांगड्या घालण्यास मज्जाव, तर विद्यार्थ्यांना हाताला गंडा, कपाळाला टिळा लावण्यास बंदी केल्याचा फतवा काढल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या फतव्या प्रकरणी एकीकडे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण विधानसभा संघटक रूपेश भोईर यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे शिक्षण विभागाने शाळेला नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे.
शाळेत असा कधीही प्रकार घडला नव्हता. आता विद्यार्थीनी शाळेत जाताना कपाळाला टिकली लावून, हातात बांगड्या घालून गेल्या, विद्यार्थ्यांनी हातात गंडा घातला, कपाळाला गंध/टिळा लावलेला असला तर त्यांना तात्काळ शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्या कपाळ्यावरील गंध/टिळा पुसून काढला जातो. कपाळावरची टिकली, हातामधील बांगड्या काढून टाकण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांसह पालकांनी केल्या आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण विधानसभा संघटक रूपेश भोईर यांनी सांगितले की, के. सी. गांधी शाळेत अलीकडे मुलींना कपाळवरच्या टिकल्या, हातात बांगड्या, मुलांना कपाळावर टिळा, हातात गंडे बांधण्यास मज्जाव केला जात आहे. कपाळावर टिकली, टिळा असेल तर तो काढून टाकण्यास सांगितला जातो. आपला मुलगा शाळेत गेला तेव्हा त्याच्या कपाळाला टिळा होता. त्याला तात्काळ स्वच्छतागृहात नेऊन कर्मचाऱ्याने त्याच्या कपाळावरील टिळा पुसून काढला.
काही पालक आणि विद्यार्थ्यांनी यासंदर्भात आपल्याकडे तक्रारी केल्या. म्हणून आपण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच या संदर्भात शाळेच्या संचालकांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा होऊन शाळेने असे कुठल्याही प्रकारचे विद्यार्थ्यांवर बंधन घालू नये, अशी मागणी आपण त्यांच्याकडे केल्याचे संघटक रूपेश भोईर यांनी सांगितले. शाळेने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले.
कपाळाला टिळा/हातात राखी बांधल्यास मारहाण करता, शिक्षा करण्याची धमकी देता, आता उत्तर द्या. के. सी. गांधी शाळेत विद्यार्थ्यांना टिकली, टिळा लावण्यास बंदी केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात शाळेला नोटीस पाठवली आहे. हा विषय शाळा व्यवस्थापन, पालक यांच्यातील सामंजस्याने मिटविला जाईल.
भारत बोरनारे (शिक्षणाधिकारी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग)
शाळेने असा कोणताही प्रकारचा फतवा अथवा निर्देश काढला नाही. आमच्या शाळेमध्ये सर्व धर्म विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आमच्यासाठी ते कोणत्या धर्माचे नसून सर्व जण हे विद्यार्थी म्हणून आहेत आणि शाळेला सर्व विद्यार्थी समान आहेत.तसेच ज्या काही तक्रारी आल्या आहेत त्या तक्रारीवरून योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करू.
स्वप्नाली रानडे (संचालिका : के. सी. गांधी विद्यालय)