मुंबई : शाळांच्या नावांमधील ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’, ‘सीबीएसई’ यांसारख्या शब्दांमुळे पालकांची दिशाभूल होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने या शब्दांचा वापर टाळण्याच्या सूचना दिल्यानंतर राज्यातील शाळा, संस्थाचालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः अस्तित्त्वात असलेल्या शाळांची नावे बदलण्याची सक्ती करू नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
राज्यातील अनेक शाळा प्रत्यक्षात राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असतानाही त्यांच्या नावांमध्ये ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘सीबीएसई’, ‘इंग्लिश मिडियम’ असे शब्द वापरले जात असल्याचे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे.
या नावांमुळे संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय किंवा केंद्रीय मंडळाशी संलग्न असल्याचा चुकीचा समज पालकांमध्ये निर्माण होत असून, त्यातून शैक्षणिक फसवणुकीचा धोका वाढत असल्याचे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर नव्याने मान्यता मागणाऱ्या तसेच दर्जावाढीसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळांच्या नावांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालक, विद्यार्थी आणि समाजाची दिशाभूल करणारी नावे आढळल्यास ती तत्काळ बदलण्याबाबत शाळा व्यवस्थापनांना सूचित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सध्या अस्तित्त्वात असलेल्या शाळांच्या नावांबाबतही कारवाईचे संकेत देण्यात आल्याने संस्था चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाच्या निर्देशांना विरोध करत महामुंबई परिसरातील विविध शाळा संस्थाचालक, विश्वस्त आणि मुख्याध्यापकांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत अस्तित्त्वात असलेल्या शाळांच्या नावांमध्ये कोणताही बदल केला जाऊ नये, असा ठाम पवित्रा घेण्यात आला. शाळेचे नाव बदलण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट, खर्चिक आणि प्रशासकीयदृष्ट्या गैरसोयीची असल्याचा सूर बैठकीत उमटला.