मुंबई : मुंबईतील मराठी शाळा आणि मुलांचे शिक्षण टिकवण्यासाठी पालकांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनी केले. संत कक्कय मार्ग शाळा संकुल येथे मराठी शाळा पाडण्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते. या वेळी अभिनेत्री व मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत, आम आदमी पक्षाच्या प्रणाली राऊत, माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश हेगिष्टे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले, मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा यायला हवी. धर्म कोणताही असो मुस्लिम, हिंदू किंवा ख्रिश्चन स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. मुलांना मराठी माध्यमात शिकवले पाहिजे, त्यासाठी शाळा टिकल्या पाहिजेत. पण आज महापालिका धोकादायक नसलेल्या शाळांनाही पाडण्याच्या नोटिसा देत आहे. ही ‘बुलडोझरशाही’ आम्ही चालू देणार नाही.
अभिनेत्री चिन्मयी सुमीत म्हणाल्या, आपण ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणची भाषा शिकणे आणि मुलांना शिकवणे आवश्यक आहे. मातृभाषेत शिकणारी मुले जास्त आत्मविश्वासू आणि समजूतदार बनतात. इंग्रजी माध्यमच उज्ज्वल भविष्य देईल हा गैरसमज पालकांच्या मनातून दूर झाला पाहिजे. आम आदमी पक्षाच्या प्रणाली राऊत यांनी पालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत पालिकेच्या कारभारात बिल्डर लॉबीचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला.