

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की, हा सामान्य स्फोट नव्हता, तर देशभरात स्फोटांची मालिका आखणाऱ्या संघटित दहशतवादी मॉड्यूलचा भाग होता. हा कट जेथे शिजला त्या अल-फलाह विद्यापीठ (फरिदाबाद) आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या निधीची चौकशी करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. यामध्ये राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि गुप्तचर विभाग (आयबी) चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत लाल किल्ला स्फोटाच्या तपासावर, त्यात सहभागी असलेल्या संशयित नेटवर्कवर, निधी देण्याच्या माध्यमांवर आणि परदेशी हँडलर्सच्या कारवायांवर चर्चा झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्र्यांनी या संपूर्ण नेटवर्कच्या मुळाशी जाण्यासाठी अल-फलाह विद्यापीठ (फरिदाबाद) आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या निधीची सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अंमलबजावणी संचालनालय आता विद्यापीठाच्या खात्यांची आणि तेथे काम करणाऱ्या डॉक्टरांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करेल. विद्यापीठाच्या नावाने परदेशातून मिळालेल्या काही निधीचा वापर संशयास्पद कारवायांसाठी होत असल्याच्या संशयावरून ही चौकशी सुरू करण्यात आली.
याव्यतिरिक्त परदेशातून कोणत्या खात्यांना निधी मिळाला आणि तो कुठे वापरला गेला हे निश्चित करण्यासाठी ईडी फॉरेन्सिक ऑडिट करेल. सूत्रांचे म्हणणे आहे की, गृहमंत्र्यांनी बैठकीत एक कडक संदेश दिला की, या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना जगाला दिसेल अशा प्रकारे शिक्षा केली जाईल. भारतीय भूमीवर पुन्हा कोणीही असा गुन्हा करण्याचे धाडस करणार नाही.
या तपासात आणखी एक डॉक्टर डॉ. आदिल अहमदचे नावही समोर आले. त्याला 6 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून अटक करण्यात आली होती. आदिलने लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या अगदी 10 दिवस आधी, 31 ऑक्टोबर रोजी श्रीनगरहून दिल्लीला विमान प्रवास केला. त्याच्या भाड्याच्या घरात सापडलेली विमान तिकिटे आणि इतर कागदपत्रांमुळे एजन्सींना त्याच्या दिल्लीतील वास्तव्याबद्दल आणि त्याच्या नेटवर्कबद्दल नवीन माहिती उघड झाली आहे.
संचालक सिद्दीकी यांचे 15 कंपन्यांशी लागेबांधे
फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाचे संचालक जावेद अहमद सिद्दीकी हे 15 कंपन्यांमध्ये संचालक किंवा भागीदार म्हणून सूचीबद्ध आहेत. यापैकी नऊ कंपन्या शिक्षण, सॉफ्टवेअर विकास, कृषी, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी संशोधन यासारख्या क्षेत्रात कार्यरत आहेत. तारबिया फाऊंडेशन, जवळच्या मुर्तजा अपार्टमेंटस् (274बी) मधून कार्यरत आहे.
मे 2025 मध्ये नोंदणीकृत एमजेएच डेव्हलपर्स, कृषी आणि पशुपालन क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपन्यांमध्ये वारंवार दिसणारी नावे सुफयान, सौद आणि शिमा सिद्दीकी, फरदीन बेग आणि मोहम्मद जमील खान आहेत. फरदीन बेग अल-फलाह स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये फॅकल्टी सदस्य म्हणून काम करतात.