मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला धक्का देत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद ताब्यात घेतले. या निवडणुकीत भाजपाने सर्व शक्ती पणाला लावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच जिल्ह्यात मात दिल्याने हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीचे पडसाद महायुतीत उमटण्याचे संकेत असून भाजपा आणि शिवसेनेत निर्माण झालेला बेबनाव वाढण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्हा परिषदेत भाजपने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी केल्यानंतर सावध झालेल्या एकनाथ शिंदे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना सोबत घेऊन सातारा जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी रणनीती आखली होती. अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे होते. मात्र, भाजपाने अखेरच्या क्षणी आक्रमक व्यूहरचना करीत सर्व शक्ती वापरून विजय खेचून घेतला. त्यात भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडून आपल्याच मित्रपक्षाला धक्का दिला. छत्रपती संभाजीनगरनंतर सातारा जिल्ह्यात भाजपाने शिवसेना सदस्य फोडून सत्ता हस्तगत केली. या घडमोडीने महायुतीत बेबनाव वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः भाजपा आणि शिवसेनेत वाद वाढण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीची सूत्रे स्थानिक पातळीवर भाजपाकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि शिवसेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाती होती. मात्र, पडद्याडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जातीने नजर ठेवून होते. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मात दिली.
या निवडणुकीत सरकारमधील दोन कॅबिनेट मंत्री एकमेकांना भिडले. एरव्ही पालकमंत्र्यांना सलाम ठोकणाऱ्या पोलिसांनी त्यांनाच धक्काबुक्की केली. त्यात त्यांना इजा झाली. मतदानापूर्वी सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना मतदान प्रक्रियेपासून रोखण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या वादाचे पडसाद सातारा जिल्ह्याबरोबर राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.