Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: सातारा संमेलनात नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी! Pudhari Photo
मुंबई

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: सातारा संमेलनात नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी!

सातत्याने दिसणाऱ्या नावांवर यंदा फुली; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा
स्वप्निल कुलकर्णी

मुंबई : दरवर्षी ठराविक नावांनाच संमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळते. यामुळे नवीन चेहरे समोर येऊ शकत नाहीत. संमेलनाच्या निमित्ताने नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी, यासाठी सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये दरवर्षी सातत्याने दिसणाऱ्या कलाकारांच्या नावावर यंदा फुली मारण्यात येणार असून त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा क्रांतिकारी निर्णय यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे.

पुढील वर्षी 1,2, 3 आणि 4 जानेवारी दरम्यान सातारा येथे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. गेल्या काही वर्षांपासून संमेलनाची कार्यक्रमपत्रिका पाहिली तर संमेलनामध्ये एक प्रकारचा तोच तोपणा आल्याचे पाहायला मिळत असे. अनेकदा परिसंवाद, कविसंमेलने आदी कार्यक्रमात तीच ती नावे पहायला मिळायची. मात्र यावर्षी ही परंपरा खंडित होणार आहे. येत्या साहित्य संमेलनातील कविकट्टा आणि गझलकट्टा तसेच परिसंवादामध्ये अनेक युवा साहित्यिकांचा, वक्त्यांचा समावेश झाल्याचे आशावादी चित्र पाहायला मिळणार आहे.

याबद्दल बोलताना अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले की, 'जुन्यांचा आदर आणि नव्याचा स्वीकार' हेच आजच्या गतिमान जगातले एक महत्त्वाचे सूत्र आहे. ते स्वीकारण्याचा एक भाग म्हणून साहित्य प्रवाहात तरुणांचा, नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यासाठी काही नवे मार्ग चोखाळावे लागतील. त्यासाठी आजची तरुण पिढी काय बोलत आहे, त्यांचा विचार काय आहे, याचा कानोसा घेणे महत्त्वाचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून साताऱ्यातील साहित्य संमेलनात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे आम्ही ठरवले आहे.

ज्येष्ठांनी नवीन लोकांसाठी जागा रिकाम्या कराव्यात

मागील तीन वर्षातील संमेलनात सहभागी झालेले कवी तसेच वक्त्यांची नावे यंदा दिसणार नाहीत, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी महामंडळाने घेतली आहे. साहित्य संस्थांना गेल्या तीन वर्षातील कार्यक्रम पत्रिका पाठवून ही नावे परत नकोत, असे आवाहनही करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचा व्यासपीठ असं आहे की, एकदा येथे येऊन गेले की पुन्हा तिथे सतत आलं पाहिजे, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. ज्येष्ठांनीही नवीन लोकांसाठी जागा रिकाम्या करायला हव्यात. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात नवीन चेहरे दिसतील, असेही अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

सातारा संमेलनात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असेल तर तो सकारात्मक निर्णय आहे. मात्र हे करत असताना संमेलनातील कार्यक्रमांचे विषय आणि आशय यात बदल करणे आवश्यक वाटते. दरवर्षी तेच ते विषय नकोत. येणारे नवीन चेहरे जुन्यांचीच 'री' ओढणारे असतील तर काय उपयोग? अर्थात हे बदल एकदम होणार नाहीत त्याला वेळ द्यावा लागेल. मात्र नवोदितांचा निर्णय योग्यच आहे.
- प्रणव सखदेव, युवा साहित्यिक
नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असेल तर तो सकारात्मक निर्णय आहे. पण त्यांची निवड करताना महामंडळ कोणते निकष लावणार आहे, हे स्पष्ट व्हायला हवे. त्यांची साहित्य सेवा काय आहे, त्यांनी नवीन कोणते लिखाण केले आहे? यांसारख्या गोष्टींचा विचार व्हावा. नवीन साहित्यिकांची निवड करताना 'कोटा' सिस्टीम वापरू नये, असे वाटते.
- किरण येळे, लेखक, कवी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT