मुंबई : महत्त्वाच्‍या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तारीकरण प्रकल्पाचे आणि मेट्रो २ ब मार्गिकेवरील चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री गिरीष महाजन, भाजपाचे गटनेते आ. प्रवीण दरेकर, आ. अबू आझमी आदी दिसत आहेत. pudhari photo
मुंबई

Santacruz Chembur Link Road expansion : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तारीकरणाचे लोकार्पण; चेंबूर मेट्रो स्थानकही सेवेत

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला बळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तारीकरण प्रकल्पाचे आणि मेट्रो २ ब मार्गिकेवरील चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बीकेसी कनेक्टर उड्डाणपुलाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. बाबासाहेब अनंतराव भोसले यांचे नाव देण्यात आले.

वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील वाहतूक कोंडी कायमची संपविण्यासाठी २०१७-१८ मध्ये सहा जोडमार्ग निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काम सुरू होऊन सहा जोड मार्गांचे आठ झाले. आज शेवटच्या जोड मार्गाचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबईचे दळणवळण गतिमान होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

भारत नगर रोड ते वाकोला जंक्शन ही उन्नत मार्गिका सुखद प्रवासाचा अनुभव देणारी ठरणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अंडरपास किंवा अन्य उपाययोजनांची परिस्थितीनुरूप अंमलबजावणी करावी. चेंबूर मेट्रो स्थानकामुळे मुंबईकरांना एक मोठी व चांगली दळणवळणाची जोडणी मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

  • मुंबई महानगरात मेट्रो मार्गिका विकसित करण्याचे काम वेगाने सुरू असून यावर्षी ६० ते ७० किलोमीटर मार्ग सेवेत येतील. मुंबई महानगरात ९० लाख प्रवासी उपनगरीय लोकलच्या माध्यमातून प्रवास करतात आणि जवळपास ७० लाख प्रवाशांची क्षमता मेट्रोच्या माध्यमातून विकसित केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बीकेसी, कलिना, कुर्ला, चेंबूरमार्गे पूर्व द्रुतगतीपर्यंत आता अखंड प्रवास

  • सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पातील भारत नगर रोड (मुंबई विद्यापीठ परिसर) ते वाकोला जंक्शन उन्नत मार्ग हा अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.

  • १.४० किमी लांबीचा हा उन्नत मार्ग असून या जोडणीमुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांच्यातील संपर्क अधिक सुलभ झाला आहे.

  • सुमारे १०.३० किमीचे एकात्मिक सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड जाळे मुंबई विद्यापीठ परिसर, बीकेसी, मुंबई विमानतळ आणि प्रमुख व्यावसायिक केंद्रांना वेगवान जोडणी उपलब्ध करून देणार आहे.

  • कलिना, वाकोला आणि कलानगर परिसरातील वाहतूक कोंडी टाळून प्रवास केल्याने प्रवासाच्या वेळेत सुमारे ३५ मिनिटांपर्यंत बचत होण्याची अपेक्षा आहे.

चेंबूर मेट्रो स्थानकामुळे पुढील मेट्रोजोडणी अधिक वेगवान

  • चेंबूर मेट्रो स्थानक हे चेंबूर उपनगरीय रेल्वे स्थानक आणि चेंबूर मोनोरेल स्थानकाशी जोडणी उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण बहुविध वाहतूक केंद्र ठरणार आहे.

  • चेंबूर मेट्रो स्थानकामुळे भविष्यात डी. एन. नगर,

  • वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द आणि मंडाळे यांदरम्यानची मेट्रोजोडणी अधिक वेगवान होणार आहे.

  • दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व प्रवाशांसाठी आधुनिक व सुलभ प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • या लोकार्पणानंतर मेट्रो मार्गिका २ब वरील सहा स्थानके कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT