वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनू सैद या मैदानाची विविध कारणांमुळे दुरावस्था झाल्याची बातमी पुढारीने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत प्रशासनाने या मैदानातील अवैध पार्किंगवर धडक कारवाई केली. याप्रकरणी स्थानिक खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे.
सानपाडा परिसरात चांगल्या प्रकारे खेळाची मैदाने तसेच उद्याने उपलब्ध आहेत. परंतु हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाच्या आजूबाजूला असलेला सोसायटीमधील रहिवाशी या मैदानात त्यांच्या गाड्या पार्क करत असतात. या गाड्या दिवसभर आणि रात्रीही येथे उभ्या असतात. गाड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुलांना या मैदानात खेळण्यास मनाई केली जात होती.
यामुळे लहानग्यांच्या आनंदावर विरजण पडत असे. याच मैदानामध्ये एक अतिक्रमित पोलीस ठाणे होते. या सानपाडा पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस गुन्ह्यात सापडलेल्या गाड्या बेवारस स्थितीत धुळखात पडून होत्या. तसेच मैदानात नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग होते.
आयुक्त कैलास शिंदे यांनी आज तुर्भे येथील निवडणूक कार्यालयाचा दौरा केला. यानंतर ते पामबीच मार्गे पुढे जात असताना त्यांना हुतात्मा बाबू गेनू मैदानाची दुरावस्था दिसली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अनिल भोईर यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या सहाय्याने या ठिकाणच्या गाड्यांवर कारवाई केली. तसेच काही गाड्या जप्त करून डंपिंग ग्राउंडवर नेण्यात आल्या.
मैदानाची साफसफाई करण्यात आली असून कोणीही मैदानात गाडी पार्किंग करू नये यासाठी मैदानाच्या दरवाजांना टाळे लावण्यात आले. मुलांना मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापुढे मैदानात कोणी अवैध पार्किंग केली, तर संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी माहिती अतिक्रमण विरोधी विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी दिली.