Sanjay Raut on Tiranga Rally Shivaji Park Pudhari
मुंबई

Sanjay Raut : युवा पिढीत भाजपच्या 'आयटी सेल'लाही टाळे ठोकण्याची ताकद : संजय राऊत

सर्वांचे आभार मानण्‍यासाठी आज शिवाजी पार्कवर 'तिरंगा रॅली'चे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on Tiranga Rally Shivaji Park : "राज्यकर्त्यांनी जनतेसमोर आणि तरुणांसमोर नेहमी नम्रता बाळगली पाहिजे. तुमचे वर्तन हिटलर, मुसोलिनी किंवा गदाफीसारखे असेल, तर जनता तुमचा अंतही तसाच करेल. जंतर-मंतरवरील आंदोलनाने दाखवून दिले आहे, की भाजपच्या आयटी सेललाही टाळे ठोकण्याची ताकद या नव्या युवा पिढीत आहे. या आंदोलनाचा बोध सरकारने घेतला आहे की नाही," हे आगामी संसद अधिवेशनात दिसेल, असे असे उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २६) माध्‍यमांशी बोलताना सांगितले.

सर्वांचे आभार मानण्‍यासाठी आज 'तिरंगा रॅली'चे आयोजन

NEET परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर जंतर-मंतरवर पेटलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला युवाशक्तीसमोर झुकावे लागले असून एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला याचा आनंद आहे. जंतर-मंतरवरील आंदोलन संपल्यानंतर सर्व तरुणांचे आणि नागरिकांचे आभार मानण्यासाठी आज रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्क (दादर) जवळ एका भव्य 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीत कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा फडकणार नाही, केवळ राष्ट्रध्वज (तिरंगा) असेल, असेही संजय राऊत यांनी स्‍पष्‍ट केले.

आनंद व्यक्त करताना सर्वांनी संयम राखायला हवा

१२ वर्षांनंतर का होईना, आजच्या मोदी सरकारला युवाशक्तीच्या मागण्यांसमोर झुकावे लागले, याचा नक्कीच आनंद आहे. परंतु, आनंद साजरा करताना विसरता येणार नाही की या लढ्यात तब्बल २० ते २१ तरुणांनी आपले प्राण गमावले आहेत. पोलिसांनी लाठीमार केला, डोकी फोडली, पॅलेट गनच्या गोळ्या झेलल्या अन् कित्येकांची दृष्टी गेली. त्यामुळे आनंद व्यक्त करताना सर्वांनी संयम राखायला हवा," असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.

आजच्‍या रॅलीत केवळ दोनच प्रमुख भाषणे

आजच्‍या रॅलीमध्ये कोणतेही मोठे व्यासपीठ नसेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भाषणे होतील. आज रविवार असल्याने मुंबईकरांना लवकर मोकळे केले जाईल, जेणेकरून ते आपल्या घरी जाऊन आपली दुपार आनंदाने साजरी करू शकतील, असेही राऊत म्‍हणाले.

पंतप्रधान आणि धर्मेद्र प्रधानांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत संजय राऊत म्हणाले, "प्रशासकीय हलगर्जीपणामुळे पेपर फुटले आणि २० हून अधिक तरुणांवर आत्महत्येची वेळ आली. एकाचे जीवन संपविण्‍यास जबाबदार असलेल्या व्यक्तीवर जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो, तर या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून देशाच्या पंतप्रधानांपासून ते माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. नव्या शिक्षण मंत्र्यांना तर आधी 'नीट' म्हणजे काय हे विचारायला हवे."

विरोधी पक्षांना आवाहन

जंतर-मंतरवर सर्व विद्यार्थी संघटना लाल, निळा अन् इतर सर्व झेंडे बाजूला ठेवून एकत्र आल्या होत्या. त्याच धर्तीवर देशातील सर्व विरोधी पक्षांनी आपले पक्षाचे बावटे दूर ठेवून एकत्र लढा दिला, तर नरेंद्र मोदी सरकार एक दिवसही सत्तेत राहू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "मी स्वतः अरविंद केजरीवाल, राहुल गांधी आणि इतर प्रमुख नेत्यांशी दूरध्वनीवरून प्रदीर्घ चर्चा केली आहे. ईव्हीएम, आमदार-खासदार फोडाफोडी आणि संविधानावरील हल्ल्यांविरोधात सर्वांना एकत्र आणण्याचे काम सुरू आहे," असेही ते म्‍हणाले.

राजीनामा पत्रात पश्चात्तापाची एक ओळही नाही

"शरद पवार हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत, मोदींनी त्यांच्या अनुभवाचा विचार केला असावा. पण जंतर-मंतरवरून जो धक्का द्यायचा होता तो पोहोचला आहे. मंत्र्यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या पत्रात पेपरफुटीबद्दल, तरुणांच्या आत्महत्येबद्दल किंवा पोलिसांच्या लाठीमाराबद्दल पश्चात्तापाची एक ओळही नाही. मग या तरुणांना इतके दिवस उपाशी का ठेवले?" असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT