Sanjay Raut PM Modi Election Commission: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बंडखोर उमेदवारांचा चांगलाच समाचार घेतला. याचबरोबर त्यांनी शिवसेना आणि मनसे यांच्यातील सीट शेअरिंबाबत देखील भाष्य केलं. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी धार्मिक कार्यक्रमाच्या आडून प्रचाराला येत असल्याचा आरोप केला. त्यांनी यावरून निवडणूक आयोगाला देखील कारवाई न करण्याबाबत कोपरखळ्या मारल्या.
संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत अप्रत्यक्षरित्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचं सांगितलं. त्यांनी भाजपने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फौज मुंबईत उतरवणार असल्याचं सांगत निवडणूक आयोगवर देखील टीका केली.
ते म्हणाले, 'नरेंद्र मोदी धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईत येत आहे. भाजपनं अनेक देशांच्या राष्ट्रपतींना देखील या निवडणुकीत उतरवलं तरी आश्चर्य वाटायची गरज नाही. माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी ११ तारखेला मुंबईत येत आहेत. ते एका धार्मिक कार्यक्रमासाठी येणार आहेत. तो कार्यक्रम जैन समाजाचा आहे. ते जैन समाजाला भाजपला मतदान करा असं सांगायलाच येत आहेत.'
राऊत यांनी यावरून निवडणूक आयोगाला देखील घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, 'निवडणूक आयोग काय डुलक्या काढत आहे का...वाघमारेंनी आपल्या नावाला जागावं. त्यांनी या भाजपच्या लांडग्यांना आवरलं पाहिजे.'
शिवसेनेने उमेदवार जाहीर केले नाहीत याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी, 'शिवसेनेतर्फे याद्या जाहीर केल्या जात नाहीत. उद्या तुम्हाला कळेल की उमेदवारी कोणाला दिली आहे. याद्या जाहीर करण्याचे हे प्रकार बहुतेक थांबवले आहेत. काल संध्याकाळी ज्यांना शिवसेनेनं अर्ज दिला त्यांनी अर्ज भरले आहेत.' असे सांगितले.
राऊत पुढे म्हणाले की, 'मनसेच्या उमेदवारांनी देखील अर्ज भरलेत. काही ठिकाणी शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.' राऊत यांनी मनसेच्या जास्तीजास्त सीट निवडून येण्याचा शिवसेनेलाच फायदा आहे. त्यांमुळं आम्ही बहुमताच्या आकडा पार करू शकू असे सांगत युतीबाबत शंका घेणाऱ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.