Sanjay Raut On Fadnavis: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक मोठे अन् खळबळजनक विधान केलं आहे. सध्या दाओसच्या दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांची पावले पंतप्रधानपदाकडे वळत आहेत असं विधान त्यांनी केलं. याचबरोबर त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत बीएमसी निवडणुकीनंतर महापौर निवडीवरुन सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचावरून राज्याच्या राजकारणात मजा येणार आहे असं देखील वक्तव्य केलं.
संजय राऊत यांनी आज (दि. १९ जानेवारी) पत्रकार परिषदेत मुंबईच्या महापौरपदावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी, 'ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथेच आम्ही त्यांचा पराभव केला असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. मोदींना राजकीय इतिहासाचं भान नाही. गेल्या २५ वर्षात मुंबईवर शिवसेनेचंच राज्य आहे. इथं काँग्रेस नाही तर शिवसेनाच आहे.' असं प्रत्युत्तर दिलं.
त्यानंतर त्यांनी मोदींना त्यांचे भाषण लिहून देणारा बदलावा कारण त्यांचे राजकीय भान कच्चे आहे असा सल्ला देखील दिला. राऊतांनी काँग्रेसने इंग्रजांविरूद्ध संघर्ष केला त्यावेळी भाजपचा जन्म देखील झाला नव्हता असं सांगितलं.
सध्याच्या महापौर आणि हॉटेल पॉलिटिक्सबाबत सुरू आहे त्यावर देखील भाष्य करत आम्ही सध्या मजा बघतोय. शिवसेनेचे नगरसेवक कैदेत आहेत. आता भाजपचे नगरसेवक देखील हलवले जातील. कोण कोणाला घाबरतंय बघा असं देखील राऊत म्हणाले.
यानंतर संजय राऊत यांनी एक वेगळेच वक्तव्य केलं. त्यांनी दाओसमध्ये गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एखाद्या पंतप्रधानांचे स्वागत व्हावे तसे स्वागत झाले. यावरून टोमणे मारले. ते म्हणाले, 'मुंख्यमंत्र्यांचे दाओसवरून मुंबईवर लक्ष आहे. त्यांच्यावर फुले काय उधळली, झेंडे काय दाखवले गेले. त्यांचे जंगी स्वागत केलं गेलं.
देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान पदाकडे पावले वळली आहे. मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे. त्यांनी दिल्लीत जावं. त्यांना झेंडे दाखवले गेले आहेत. असं स्वागत पंतप्रधानांचं असतं. मी तरी मुख्यमंत्र्यांचे असे स्वागत पाहिलेली नाही. आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. असे वक्तव्य करत टोमणे देखील मारले.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याची चर्चा सुरू आहे या प्रश्नावर संजय राऊत यांनी आम्ही सूत्रांवर विश्वास ठेवत नाही असे म्हणतं हे वृत्त फेटाळून लावलं.
त्यांनी आमचे नगरसेवक घरात आहेत. आमच्या नगरसेवकांची बैठक ही मातोश्रीवर होते. ते आपापल्या गाड्यांनी त्यांच्या घरी जातात. तुम्हीच तुमचे नगरसेवक पंचतारांकितमध्ये कैद करून ठेवले आहेत. असं म्हणत जी काही फोडाफोडी होणार ती भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांमध्येच होणार असं ठासून सांगितलं. त्यांनी काँग्रेसचे देखील नगरसेवक फुटत नाहीत असा दावा केला.