Sanjay Raut On Ambernath Political Drama: शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज (दि ९ जानेवारी) ठाण्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत झालेल्या राजकीय ड्रामेबाजीवर भाष्य केलं. त्यांनी ठाण्यात शिंदे गटाला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेले हे कट कारस्थान असल्याची टीका केली. त्यांनी ही त्यांची अंतर्गत बाब अन् लाथाळ्या असल्याचं सांगितलं. मात्र संजय राऊत यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून देखील संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसने त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करताच रविंद्र चव्हाण यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घातली. काँग्रेस विचाराचे लोक आहेत ते. त्यांनाच तुम्ही आपल्या पक्षात घेतलं आहे. आज तुम्ही त्यांना पक्षात घेऊन सत्ता स्थापन करत आहात कारण शिंदे गटाच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवायचं आहे.'
संजय राऊत पुढे म्हणाले की हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. या तुमच्या अंतर्गत लाथाळ्या आहेत. मात्र तुम्ही काँग्रेसबरोबर एक प्रकारे युती अन् आघाडी केलेलीच आहे. अकुटला देखील एमआयएम सोबत सत्तास्थापन केली जात आहे. त्यांच्यावरही कारवाई होत आहे. त्यांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन करत आहेत. मी म्हटलं ना हे एक नंबरचे बनचुके आणि ढोंगी लोकं आहेत.'
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, भाजपने महाराष्ट्रात वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न केला आहे. मी वारंवार म्हणतोय की काँग्रेस नसेल तर भाजप नाही. शिवसेना नसेल तर भाजप नाही. पूर्वी नेते किंवा कार्यकर्ते घडवले जात होते. आता पळवले जात आहेत अन् पक्ष उभा केले जात आहेत. स्वतःच्या पक्षात नेते अन् कार्यकर्ते घेडवण्याची अजिबात क्षमता नसल्यामुळं अशा प्रकारे चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून लोकांना पक्षात सामील करून घ्यायचं.
रविंद्र चव्हाणांबद्दल देखील संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, रविंद्र चव्हाणांच्या ठाणे जिल्ह्यात हे घडतंय. रविंद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याच भागात अंबरनाथचा हा प्रकार घडला आहे. त्यांना कळू नये का.. की त्यांचेच यामागे कारस्थान होतं.