Sanjay Raut on Devendra Fadnavis
"देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना कसे लोक झोपले होते, हे तुम्ही पाहिले का? काही आमदार डुलक्या काढत होते. तेव्हा जो भोंगा असतो तो नीट वाजला पाहिजे. भोंग्याला सूर असला पाहिजे, सनईसारखा वाजला पाहिजे. तसा आमचा वाजतो," असा टोला लगावत, "हे सगळे भाषणमाफिया आहेत. एक-एक, दीड-दीड तास भाषण करायचं म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या अशा लोकांना भाषणमाफिया बोलतो," अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.
सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीच्या समारोपावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. यावर संजय राऊत यांनी टीकेचा आसूड ओढला. ते म्हणाले, "तुमच्या भाषणमाफियागिरीला लोक कंटाळलेले आहेत. देशभरात 'जेन झी' (Gen Z) हे उसळलेले आहेत, ते भाषणमाफियांना कंटाळलेले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खूप काळजीपूर्वक वक्तव्ये केली पाहिजेत. राजकीय वक्तव्ये त्यांनी खूप काळजीपूर्वक, जपून केली पाहिजेत, तोंडाला येईल ते बोलू नये."
"कॉक्रोच जनता पार्टी ही 'काँग्रेस जिताओ पार्टी' असेल, तर अशा अनेक पार्ट्या बीजेपीने देखील आपल्याजवळ ठेवल्या आहेत. म्हणून तर मी म्हणतो की, हे केवळ भाषणमाफिया आहेत. आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाही. रात्री-अपरात्री येऊन तुमचे पंतप्रधान 'काँग्रेस जिताओ पार्टी'ला तुच्छ लेखत का होते? १२ वाजता इन्स्टावर व्हिडिओ, १२ वाजता फेसबुकवर व्हिडिओ, साडेबारा वाजता संवाद का साधला? तुमच्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला?" असा सवालही त्यांनी केला.
"हे लोक खोटे आकडे दाखवण्यात पटाईत आहेत. त्याच्यावरच राजकारण करतात. देशाची परिस्थिती अशी काय आहे? मग महागाई का वाढलीय, बेरोजगारी का वाढली आहे? असा सवाल करत रुपया ८९ रुपयांपर्यंत का घसरला आहे, त्याची उत्तरे द्या. बेरोजगार रस्त्यावर का उतरला आहे? नोकऱ्या लोकांना का मिळत नाहीत? तुम्ही जीडीपीवर बोला. लोकांना जीडीपी काय कळतो? अमित शाह यांना माहिती आहे का जीडीपी काय आहे ते? लोकांना रोजी, रोटी, कपडा आणि मकान हवे आहे. जीडीपी वाढला असेल तर ८५ कोटी लोकांना १० किलो धान्य देऊन का जगवत आहात? याचा अर्थ ८५ कोटी लोक उपाशी आहेत," असा दावा करत, "राज्या-राज्यांत महिलांच्या खात्यात १५०० तर कुठे १० हजार टाकून मते विकत घेत आहात. याला तुम्ही जीडीपी वाढला आहे असे बोलत आहात. म्हणून बोलतो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळे भाषणमाफिया आहेत," असेही राऊत यांनी सांगितले.
"मतदार नोंदणी व पडताळणीसाठी राबवलेल्या 'एसआयआर' (विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम) मध्ये दोन कोटी मतदार आणि मुंबईत ३६ लाख मतदार वगळले. मुंबईत ३६ लाख मतदार वगळणे आणि महाराष्ट्र सरकार राज्यात दोन कोटी मतदार वगळणे ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. पश्चिम बंगालमध्ये ८५ लाख मतदार वगळले; जे काँग्रेसला मतदान करतील अशी शंका होती आणि तिथे भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत. त्याच्याविषयी आमचे देखील संशोधन (रिसर्च) सुरू आहे. मुंबईत ३६ लाख हा आकडा सामान्य नाही. एका विशिष्ट समाजाचे, विशिष्ट धर्माचे किंवा जिथे विरोधकांना चांगले मतदान होते, त्या भागांतील मतदार कमी करण्याचे काम सुरू आहे," असा आरोपही त्यांनी केला.
"डॉक्टरांना जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याबद्दल शिंदे शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. तुम्ही सांगत आहात ते खरे असेल, तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दबाव आणला आणि आत्महत्येस प्रवृत्त केले, हे काही साधे प्रकरण आहे का? कायदा काय सांगतो? पोलिस काय करत आहेत?" असा सवालही त्यांनी केला.
"अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला. त्यामागील भावना समजून घेतल्या पाहिजेत. अमित ठाकरे यांनी फोटो का काढायला लावला? त्यांना असे वाटले की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठे नाही, त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हे त्यांचे म्हणणे आहे. ही महाराष्ट्राची भावना आहे. पंतप्रधान आज आहेत, उद्या नाहीत. जेव्हा ते पंतप्रधान नसतील, तेव्हा त्यांचा फोटो कोणी भिंतीवर लावणार नाही. भाजपवाले देखील लावणार नाहीत. हिटलरचा फोटो कोणी जर्मनीमध्ये लावते का? कोणीही लावत नाही. त्यामुळे त्यांनी तो फोटो एका शिवभक्तीच्या प्रेरणेने काढला असावा, असेही संजय राऊत म्हणाले.
"मोहन भागवत बोलतात की पाकिस्तानबरोबर चर्चा व्हायला पाहिजे. 'कन्नड रक्षण वेदिका' ही देशातील संस्था आहे. त्यांचा मराठीला असलेला विरोध आम्हाला मान्य नाही, तो आम्ही सहन करणार नाही. तरीही देशभरामध्ये जी हिंदी भाषा लादली जाते, त्यासंदर्भात सगळ्यांनी एकत्र यायचे असेल तर प्रत्येक घटक एकत्र आला पाहिजे. आज जो विषय तुम्ही म्हणत आहात, तो माझ्यापर्यंत आलेला नाही."
"आम्ही काय म्हणत होतो इतकी वर्षे? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अचानक ४४ लाख मतदार घुसवले. महाराष्ट्रात आणि त्या ४४ लाख मतदारांनी निर्णय फिरवला. हे ४४ लाख मतदार कुठून आले, याचा हिशोब निवडणूक आयोग देत नाही आणि मुख्यमंत्रीही देत नाहीत. आणि आताही दोन कोटी मतदार वगळत आहात, हा देखील त्यातलाच प्रकार आहे. आम्ही यावेळेला त्यांना सोडणार नाही," असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.