मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भ्रष्टाचार आणि घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. त्यांची संपत्ती विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, असा दावा करून राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्तीचे माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे. यासंदर्भात कडू यांच्याशी मध्यस्थी करण्याची जबाबदारी सरकारने महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे दिली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी राऊत यांना विचारले असता त्यांनी सरकार आणि बावनकुळे यांना लक्ष्य केले.
राज्यातील शेतकरी हा प्रजा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सामोरे जायला हवे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवावी, असे सांगतानाच बावनकुळेंना कशाला पाठवता असा संतप्त सवालही त्यांनी केला. मात्र, बावनकुळेंची घोटाळ्याची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे आपण दोन दिवसांत बाहेर काढणार आहे. हा आठवडा जाऊ द्या, फाईल तयार होत आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.
भ्रष्टाचाराला कधीच थारा दिलेला नाही : बावनकुळे
संयज राऊत यांना प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, माझी जी संपत्ती आहे ती त्यांनी घ्यावी आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून द्यावे. माझ्या प्रतिज्ञापत्रात माझ्या संपत्तीचा उल्लेख केला आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त निघाली तर त्यांनी ती पूर्णपणे घेऊन टाकावी. ही माझी त्यांना खुली ऑफर असून त्यांनी नोंदणी करण्यासाठी उद्याच यावे आणि कर्जमाफीची घोषणा त्यांनी करून टाकावी, असे थेट आव्हान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. राऊत यांचा हा बोलघेवडेपणा असून आम्ही भ्रष्टाचाराला कधीच थारा दिलेला नाही. आमच्या तो रक्तातही नाही. त्यांच्या त्या तोंडाच्या वाफा आहेत. त्यांना काय काढायचेय ते लवकर काढावे, माझे त्यांना खुले आव्हान आहे, असेही बावनकुळे म्हणाले.