Sanjay Raut Statement about Threat :
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना शिंदे गटाकडून मिळणाऱ्या धमक्यांना सडेतोड उत्तर दिलं. संजय राऊत यांनी आपण सच्चा शिवसैनिक असून कोणाला घाबरत नाही असं सांगितलं. याचबरोबर त्यांनी राज्यातील नेत्यांच्या बेताल वक्तव्यांबाबत देखील मोठं विधान केलं आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत ज्यावेळी संजय राऊत यांना ठाण्याचा दौरा आणि धमक्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी 'ज्यावेळी मला इडी आणि अमित शहांकडून धमकी आली होती त्यावेळी मी पळून गेलो नाही तर तुरूंगात गेलो. असं उत्तर दिलं.
त्यांनी शिंदे गटाचे आव्हान स्विकारत आहे असं सांगत काल रात्री ठाण्यात जाऊन आलो आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. मी एकटा फिरतो. माझ्यासोबत सरकारी पोलीस बंदोबस्त किंवा गाड्यांचा ताफा नसतो.
संजय राऊत त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांबद्दल म्हणाले, 'त्यांना आनंद दिघे समजले नाहीत किंवा माहिती नाहीत. त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी तो सिनेमा काढळा त्यातील ९० टक्के गोष्टी खोट्या आणि भंपक आहेत.'
त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या विधानाचा देखील दाखला दिला, ते म्हणाले, 'प्रताप सरनाईक यांनी असे विधान केले की एकनाथ शिंदे यांनी राजन विचारे नावाच्या दगडाला शेंदूर फासला. मग प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला? उद्धव ठाकरेंनीचा...'
ते पुढे म्हणाले की, 'प्रताप सरनाईक हे अनेक पक्ष फिरून शिवसेनेत आमदार आणि मंत्री होण्यासाठी आले. त्यांच्यावर इडीच्या धाडी पडल्यानंतर ते पळून गेले. हा त्यांचा इतिहास आहे. त्यांनी राजन विचारे यांच्याविषयी बोलू नये.' असं देखील सुनावलं.
दरम्यान, राज्यातील नेते वक्तव्य करताना पातळी सोडत आहेत याबाबत प्रश्न विचारला त्यावेळी संजय राऊत यांनी ही सगळी फडणवीसांची टीम आहे. त्यांचे पाठबळ असल्याशिवाय पडळकर अशी वक्तव्य करणार नाहीत. एकमेकांचे बाप काढण्याची सुरूवात नारायण राणे यांच्या मुलानं केल्याचं देखील संजय राऊत यांनी सांगितलं.