Sanjay Raut on mahayuti rally
मुंबई : मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये रविवार, (दि. ११) ठाकरे बंधूंची सभा झाली. त्यानंतर सोमवारी महायुतीची सभा पार पडली. आता शिवाजी पार्कवरील सभेतील गर्दीवरून महायुती आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चांगली जुंपली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. काय ही अतिविराट सभा, असा टोला लगावत, त्यांनी गद्दारांकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे, अशी पोस्ट केली आहे. विशेष म्हणजे भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या सभेतील गर्दीबाबत असाच दावा केला होता.
याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सत्यशोधक समाजाचा एक वैचारिक वारसा सांभाळणारा राज्य आहे. पण हे असत्याचे महामेरू झालेले भाजप आणि शिंदेचे लोक म्हणतात की, एक कोटी लोक होते. ते माणसं सुद्धा कोटी-कोटीला विकत घेतात. त्याच्यामुळे त्यांनी 25 कोटी रुपये खर्च करून माणसं आणण्याचा प्रयत्न केला; पण चित्र पाहता तो त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. त्या सभेला 20 हजार खुर्च्या होत्या. खुर्च्या भरलेल्या नव्हत्या. 20 हजार खुर्च्या होत्या की नव्हत्या हे खुर्च्या लावल्या त्यांना विचारा. तीन हजार खुर्च्याही भरलेल्या नव्हत्या. समोर व्हीआयपी कक्ष ठेवला होता. काही मान्यवरांसाठी त्यात शेवटी ठेकेदारांकडे काम करणारे अमराठे लोक आणून बसवले, असा दावाही त्यांनी केला.
तर शिवाजी पार्कमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेवर मनसेने देखील निशाणा साधलाय. अर्धी भरली आणि अर्धी खाली अशी सभा होती, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला. त्या दिवशी आमचे सभेचे फोटो शेअर केले पण तुमच्या सभेचं काय, असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. सायंकाळी अर्धी भरलेली अर्धी रिकामी अशी एक सभा शिवतीर्थावर पार पाडली. आमच्या इथे काही खुर्च्या रिकाम्या होत्या त्याचा फोकस टाकून वगैरे त्याच्यावरचे अरे बघा खुर्च्या रिकाम्या राहिल्या वगैरे असे फोटो टाकणाऱ्यांनी कॅमेरे काल शिखात घालून फिरत होते. सभा किती रिकामी किती भरली मला असं वाटतं हे जनतेला माहिती आहे मला वेगळं सांगायची गरज नाही. मुळात सभेचा कंटेंट काय हा महत्त्वाचा असतो, असेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.