Shiv Sena UBT MPs meeting :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांची बैठक मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी पार पडली. या बैठकीला काही खासदारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली, तर काही खासदारांनी त्यांच्या कौटुंबिक आणि स्थानिक जबाबदाऱ्यांमुळे ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदवला. या बैठकीनंतर भाजपच्या 'ऑपरेशन टायगर'बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "आम्ही स्वतःच वाघ आहोत. कसले आले 'ऑपरेशन टायगर'? आम्ही 'ऑपरेशन वुल्फ' (लांडग्यांची मोहीम) सुरू करू. बैठकीला सर्व खासदार उपस्थित होते."
बैठकीसाठी मुंबईतील 'मातोश्री' या निवासस्थानी शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख नेते आणि खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:अरविंद सावंत (खासदार, दक्षिण मुंबई), संजय दिना पाटील (खासदार, ईशान्य मुंबई), अनिल देसाई (खासदार, दक्षिण मध्य मुंबई), राजाभाऊ वाझे (खासदार, नाशिक) या चारही नेत्यांनी प्रत्यक्ष उपस्थित होते.
पक्षाचे इतर पाच खासदार वेगवेगळ्या कारणांमुळे मुंबईत येऊ शकले नाहीत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मुलावर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांनी रुग्णालयातूनच या बैठकीला ऑनलाइन हजेरी लावली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर शिर्डी येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर हे सध्या स्थानिक पातळीवर एका निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे चिरंजीव विधान परिषदेचे उमेदवार असल्याने आष्टीकर तिथे व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांनी तिथूनच ऑनलाइन हजेरी लावली. खासदार संजय देशमुख यांच्या घरी सध्या मुलीच्या लग्नाची लगबग सुरू आहे. लग्नकार्याशी संबंधित काही घरगुती बैठका आणि कामांमुळे ते यवतमाळमध्येच होते. त्यांनी घरूनच या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. खासदार संजय जाधव यांनीही ऑनलाइन माध्यमातून या बैठकीला हजेरी लावत आपले मत मांडले.
शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मुंबईत झालेल्या एका रुटीन बैठक होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व नऊ खासदारांनी भाग घेतला. ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी झालेल्या या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, चार खासदार बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते, तर इतर पाच जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते.
राऊत म्हणाले, "बैठकीला चार खासदार वैयक्तिकरीत्या (प्रत्यक्ष) उपस्थित होते आणि आमच्या पाच खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यात भाग घेतला. अशा प्रकारे, उद्धवजींसोबत झालेल्या आजच्या बैठकीत सर्व नऊ खासदार सहभागी झाले होते. आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत देखील तिथे उपस्थित होते. या सर्व नऊ खासदारांच्या उपस्थितीत आजची बैठक पार पडली आणि सकारात्मक चर्चा झाली." ही बैठक पक्षाच्या नियमित प्रक्रियेचा भाग होती आणि तिचा सध्याच्या राजकीय चर्चांशी कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपच्या 'ऑपरेशन टायगर'बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "आम्ही स्वतःच वाघ आहोत. कसले आले 'ऑपरेशन टायगर'? आम्ही 'ऑपरेशन वुल्फ' सुरू करू. आजच्या बैठकीला सर्व खासदार उपस्थित होते; काहीजण ऑनलाइन सहभागी झाले होते. जे खासदार उपस्थित नव्हते, त्यातील संजय जाधव दोन दिवसांत 'मातोश्री'वर भेट देतील."
"वास्तविक पाहता ही एक रूटीन बैठक आहे. महिन्यातून एकदा आम्ही सर्व खासदार 'मातोश्री'वर एकत्र येतो आणि उद्धवजी आम्हाला मार्गदर्शन करतात. ही एक नियमित बैठक असून सर्व खासदारांनी यात प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला आहे." पक्षात संभाव्य फुटीच्या दावा फेटाळून लावत राऊत यांनी लोकांना अशा गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.