Sanjay Raut (File Photo)
मुंबई

Sanjay Raut |"घराणेशाहीवर चिखलफेक करणाऱ्यांना पापातून ..." : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर संजय राऊत नेमकं काय म्‍हणाले?

मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचे काम भाजपने केले

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on Sunetra Pawar Oath

मुंबई : मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करेन. त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही मोदींचे अभिनंदन यासाठी करतो की, सारखं ते घराणेशाहीवर आरोप करतात. मोदी आणि अमित शहा कधीही राज्यात आले तर ठाकरेंच्या घराणेशाहीवर आरोप करतात. आता या घराणेशाहीवर चिखलफेक करणार्‍यांना त्या पापातून मुक्ती मिळाली. यापुढे भाजप घराणेशाहीवर घाणेरड्या टीका करणार नाही, अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

तटकरे आणि पटेलांनी निर्णय घेतला

अजितदादांच्या मेहनतीतून पक्ष उभा राहिला आहे. मात्र सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतला आहे. अजितदादांचा पक्ष रांगड्या लोकांचा पक्ष आहे. हे राज ठाकरेंनी सांगितलंय. हा पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये. भोसले, मोहिते, कांबळे यांच्याकडे राहावी. पटेलांकडे राहू नये. भाजपचे खांदे आणि पाठीचा कणा पिचका आहे म्हणून त्यांना दुसऱ्यांचे खांदे लागतात, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

निर्मला सीतारमण यांनी गरीबांच्या नाकी नऊ आणू नये

अर्थसंकल्पातून फार मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या जातात आणि शेवटी उद्योगपती, धनी व्यापाऱ्यांचे हित साधले जाते. निर्मला बाई त्यांच्या पर्समधून काय काढताहेत याकडे देशाचं लक्ष आहे. आत्ता आर्थिक सर्वे आला त्यात देशाची काय अवस्था आहे हे सांगितलंय. लाडकी बहिण योजनांमुळे तिजोरीवर कसा भार येतो, हे दिसलंय. निर्मला सीतारमण यांनी गरीबांच्या नाकी नऊ आणू नये, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.

धाक, दहशत, धमक्यांमुळे अजित पवारांना पक्ष सोडावा लागला

मी शरद पवारांच्या मताशी सहमत आहे. विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. अजित पवारांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यावं यासाठी बैठका घेतल्या. अशी आमची माहिती आहे. अजित पवारांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी कमालीचा आदर आणि ओलावा होता. धाक, दहशत, धमक्यांमुळे अजित पवारांना पक्ष सोडावा लागला. तरी अजित पवारांना वाटत होतं की शरद पवारांचा पक्ष आहे. विलीनीकरण होऊ नये म्हणून दिल्लीतील लोकांना मराठी मन एकत्र यावं असं कधीच वाटत नाही, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचे काम भाजपने केलं

मराठी नेते, मराठी माणसं यांच्यात फूट पाडण्याचे काम भाजपने केलं आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातील पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष पाटील, भोसले, कांबळे असाच असावा. जेव्हा अजितदादा आणि शरद पवार यांच्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेत युती झाली तेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केले. शरद पवार भाजपबरोबर जातील असं वाटत नाही. त्यांनी शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार दिला आहे. त्या विचारांची प्रताडना ते करणार नाहीत. अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते की सहभागी होते यावर संभ्रम होता. असे अनेकदा मुख्‍यमंत्री बनलेत ज्‍यांची लायकी आणि क्षमत नाही. शिंदेंनी कितीही शेपट्या आपटल्या तरी आपटून-आपटून चपट्या होतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT