Sanjay Raut on NCP merger
मुंबई : "अजित पवार हे महाराष्ट्रातील घराघरातला चेहरा असणारे नेते होते. ते गेल्याचे दुःख प्रत्येक घरात आहे. आमच्या घरात देखील दुःख आहे. अजूनही महाराष्ट्र अजित पवारांच्या जाण्याने दुःखातून सावरलेला नाही. एवढेच की, अजित पवारांच्या कुटुंबातील जर कोणी भाजपच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल, तर तो सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा कौटुंबिक विषय आहे, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण हे कौटुंबिक राजकारण आहे. त्याचा पक्ष निर्णय घेईल, फार तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे निर्णय घेतील," असे सूचक विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. ३१) माध्यमांशी बोलताना केले. भाजप हा मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा पक्ष आहे," अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
या वेळी संजय राऊत म्हणाले की, दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे मी ऐकत आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे झालेल्या दुःखातून महाराष्ट्र सावरलेला नाही. अजित पवार यांचा पक्ष स्वतंत्र गट आहे. हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे. 'वर्षा' बंगल्यावर येऊन चर्चा केली गेली, तेथे निर्णय घेतला जातोय, असा दावाही राऊतांनी केला.
राष्ट्रवादी पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या पक्षामध्ये असंख्य राष्ट्रीय नेत्यांची फळी आहे. आता या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल, तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांच्याकडे त्यांचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शहाच घेणार आहेत. अमित शहांनीच निर्णय घेतला असेल.
अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य होते. बोलण्यासारखे भरपूर आहे; पण अजित पवार यांचा दुखवटा संपत नाही तोवर मी बोलणार नाही. प्रेताच्या मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यात भारतीय जनता पक्ष हा या देशात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सुद्धा शिवसेना आता नेतृत्वहीन झाली, त्यामुळे हा पक्ष गिळण्याची त्यांची फार मोठी योजना होती; पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची ती योजना उधळून लावली. शिंदे गट आणि अजित पवारांचा गट ही भाजपच्या गर्भातून आलेली पिल्ले आहेत. हे अमित शहांचेच पक्ष आहेत. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, हे दोन्ही गट अमित शहांनी निर्माण केले. महाराष्ट्रातली प्रमुख घराणी फोडली, घरे फोडली आणि पक्ष फोडले. राज्याच्या स्वाभिमानासंदर्भात काम करणाऱ्यांशी भाजपचा संबंध नाही, असे बोलणे म्हणजे लोकांना मूर्ख समजण्यासारखे आहे.
आता शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणतात की, मला या निर्णयाविषयी काही माहिती नाही. अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे, त्यामुळे शरद पवार साहेब बोलतात ते योग्यच आहे. कोणालाच त्या विषयाची माहिती नाही, तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते तटकरे, पटेल आणि भुजबळ यांनी मंत्रालयात किंवा 'वर्षा' बंगल्यावर येऊन चर्चा केली आहे. त्यामुळे हा त्यांचाच विषय आहे. त्यांनीच निर्णय घेतला असेल; पण असे म्हटले जात आहे की या निर्णयामागे भाजप आहे, असेही त्यांनी नमूद केले.