Sanjay Raut | अशोक खरात प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षा भयंकर, मुख्यमंत्री गप्प का : संजय राऊत Pudhari Photo
मुंबई

Sanjay Raut | अशोक खरात प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षा भयंकर, मुख्यमंत्री गप्प का : संजय राऊत

रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणीही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: अशोक खरात प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. हे प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षा भयंकर आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी गुरुवारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणावर का गप्प बसले आहेत? असा सवाल त्यांनी केला. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणी राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणात महाराष्ट्रातल्या सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रातल्या अनेकांचे पुरावे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात आहेत असे सांगितले जाते. महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर केला आहे. मग महिला आयोगाच्या अध्यक्षा, मंत्री, आमदार हे सगळे अंधश्रद्धा कुरवाळत आहेत. कुणी त्या बाबाचे पाद्यपूजन करत आहेत, कुणी पूजेला बसले आहे. कुणी जादूटोणा करत आहे. ज्यांची छायाचित्रं आली आहेत त्या सगळ्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीही आहेत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले पाहिजेत.

रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांचं काम हे असते की महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणे. पण जर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचे पाय रुपाली चाकणकर धुत असतील, मंत्री त्यांच्या चरणाशी बसत असतील तर या सगळ्यांना पदावर कसे काय ठेवू शकतात? देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांना पदावरुन दूर करावे, चौकशी समिती नेमावी आणि निकाल लागत नाही तोपर्यंत यांना पदांपासून दूर करावे, अशी मागणी राऊत यांनी केली. 

महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे. महाराष्ट्र हा ढोंग आणि अंधश्रद्धा यांच्याविरोधात लढणारा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे पहिले राज्य आहे. मात्र, राजकारणातले मंत्रीच सत्ता राखण्यासाठी अशा प्रकारे अंधश्रद्धा निर्माण करत असतील तर त्यांना तातडीने बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT