मुंबई: मला जसे संभाळले तसे उद्धव आणि आदित्य यांना संभाळा या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाची, आम्ही काय पाळणघर काढले आहे काय? अशी खिल्ली शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी उडवली आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
शिंदे आणि त्यांचे मिंदे हे मातोश्रीच्या पाळणाघरातच वाढले ना! मातोश्रीचे पाळणघर नसते तर हे कुपोषणाने मेले असते, अशा शब्दांत संजय राऊत यांनी पावसकर यांची धुलाई केली.
शिंदे गटाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना पावसकर यांची जीभ घसरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाचा संदर्भ देत, आम्ही काय पाळणघर काढले आहे काय? असा खिल्ली उडवणारा सवाल पावसकर यांनी केला.
त्यावरून वादंग उभे राहताच ते पावसकर यांचे वैयक्तिक मत होते. ते आमच्या पक्षाचे मत नाही, अशी सारवासारव उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. मात्र पावसकर यांनी साक्षात शिवसेना प्रमुखांची उडवलेली खिल्ली चर्चेचा विषय ठरली.
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आणि हे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत असे म्हणतात. बाळासाहेब यांनी वृध्दाश्रम काढले आणि मुलांसाठी पाळणाघर काढले. त्याच पाळणाघरात तुमचे पालनपोषण केले. ते पाळणघर नसते तर हे कुपोषणाने मेले असते.
ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनेच्या पाळणाघरातलेच मीठ खाऊन मोठे झालात आणि बाळासाहेबांची खिल्ली उडवता, याची लाज वाटली नाही. ज्या एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने बोलत आहेत त्यांना हे मान्य आहे का? शिंदे यांनी पार्श्वभागावर लाथ मारून पावसकर यांना हाकलून दिले पाहिजे, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला. पावसकर हे खाल्ल्या घराचे वासे मोजणारे आहेत, अशी टीका आमदार अनिल परब यांनी केली.
पावसकरांची सारवासारव
शिवसेनाप्रमुखांचा अपमान करण्याचे धाडस मी स्वप्नातही करणार नाही, माझ्या विधानाचा तसा अर्थ काढणे चुकीचे आहे, असा खुलासा किरण पावसकर यांनी मंगळवारी केला. ज्यांच्यामुळे आम्ही येथे पोहोचलो, त्यांचा अवमान आम्ही कसा करू? असा प्रश्न त्यांनी केला .