मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक काही गंभीर बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः राऊत यांनी पत्राद्वारे ही माहिती आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना दिली आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी लिहिलेल्या या पत्राने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती; या मथळ्याखाली लिहिलेल्या या पत्रात संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. राऊत यांनी या निर्बंधांना 'नाईलाज' म्हटले आहे.
कार्यकर्त्यांना दिलासा देत त्यांनी पुढे म्हटले आहे की, "मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. पत्राच्या शेवटी त्यांनी 'आपला नम्र' असे नमूद करत स्वाक्षरी केली आहे.
संजय राऊत हे शिवसेनेचा आक्रमक आवाज मानले जातात. संसदेतील (राज्यसभा आणि लोकसभा) विविध समित्यांवर त्यांचा सहभाग आहे. राऊत प्रकृती अचानक ढासळल्याने महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळात तसेच शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.