मुंबई

Sanjay Raut : "तिच्यासह कुटुंबाच्या अब्रूचे धिंडवडे..." : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होण्यासाठी बिनबुडाच्या आरोपांचे राजकीय षडयंत्र

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मी कधीही बोललो नाही. त्यावर मी माझं मत व्यक्त केलं नाही. हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. एका मुलीच्या चारित्र्याविषयीचा हा प्रश्न आहे. तिच्या कुटुंबावर कोसळलेला हा आघात आहे. तिचा मृत्यू हा दुर्दैवी आहे. त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी वारंवार केला आणि मुंबई पोलिसांच्या इंटिग्रिटीवरती (निष्ठा/प्रामाणिकपणावर) शंका घेता येणार नाही. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही असं म्हटलं तर पुन्हा राजकीय हेतूने प्रेरित चर्चा सुरू होते. त्या मुलीसह तिच्या कुटुंबाच्या अब्रूचे धिंडवडे काढले जातात, अशी खंत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

आदित्य ठाकरेंचा दुरान्वये संबंध नसल्याचे पोलिसांनीच सांगितलं

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि गृहमंत्रीसुद्धा तेच आहेत. त्यांच्या काळामध्ये या प्रकरणात तपास पूर्ण होऊन अहवालही सादर करण्यात आला. त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा दुरान्वये संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आज गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यांच्याच कार्यकाळात मुंबई पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करून त्या मुलीला आणि त्या मुलीच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, वारंवार तपास केला, जे जे आरोप विरोधकांनी केले त्या दृष्टीने तपास केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही किंवा संबंध नाही, हे जेव्हा सांगितलं तेव्हा परत परत राजकीय हेतूने प्रेरित चर्चा केली जाते. त्या मुलीच्या, त्या कुटुंबाच्या अब्रूचे अशा प्रकारे धिंडवडे काढले जातात; आता राजकीय आखाडा झाला आहे, अशी खंतही व्यक्त केली जाते.

एक राजकीय षडयंत्र

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सुरू असणारे राजकारण हे राज्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. हे एक राजकीय षडयंत्र आहे. न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे की, या प्रकरणी सीबीआय चौकशी करा; पण तपास पूर्ण होत नाही, कोणी आरोपी आहे असं गृहीत धरून तपास करू नका. हे मी कालपासून पाहतो आहे, काहीजण मोठ्या मोठ्याने ओरडत आहेत. काही संशयास्पद वक्तव्ये केली जात आहेत. हे एक राजकीय षडयंत्र, राजकीय कारस्थान आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबियांवर डाग लावण्याचा हा प्रयत्न पुन्हा एकदा दिल्लीच्या माध्यमातून सुरू आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

ठाकरे कुटुंबाविरुद्ध मोहीम

बदनामीच्या मोहिमेविरुद्ध आम्ही लढत राहू. आता याच लोकांनी सोनिया गांधी, तामिळनाडूत द्रमुकचे कुटुंब, नवीन पटनायक यांच्या कुटुंबाविरुद्ध बदनामीची मोहीम सुरू केली आहे. काही काळापूर्वी चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबावरती मोहीम सुरू केली, याच लोकांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध मोहीम सुरू केली, त्याच लोकांनी आता ठाकरे कुटुंबाविरुद्ध मोहीम सुरू केली. याचे मुख्य कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये पक्ष आणि चिन्हाचा खटला सुरू आहे. कोणाला तरी भीती वाटत आहे की, जर सर्वोच्च न्यायालयाने नियमानुसार निष्पक्षपणे निर्णय दिला तर महाराष्ट्रातले राजकारण बदलून जाईल आणि ठाकरे कुटुंब व शिवसेना परत एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी येईल, म्हणून अशा प्रकारचे उद्योग सुरू झाले आहेत. पण मी परत म्हणतो, सीबीआयने तटस्थपणे तपास करायला काही हरकत नाही आणि तो तपास होऊ नये असे आम्ही कधीच म्हणणार नाही.

कोणाचे वडील काय म्हणतात, यावर खटला उभा राहत नाही

दिशा सालियन प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कोणाचे वडील काय म्हणतात, कोणाचा भाऊ काय म्हणतो यावर खटला उभा राहत नाही. आमच्यासाठी हा विषय संपला. आम्ही लढू आणि आम्ही लढत राहू. आमचे पूर्ण आयुष्य अशा प्रकारे संघर्षात गेले आहे. खोट्या व बदनामकारक मोहिमांविरोधात लढून आम्ही बाहेर पडू, असेही राऊत म्हणाले.

जरांगे पाटील यांची लढाई अत्यंत महत्त्वाची

राज्यात सध्या मनोज जरांगे पाटील यांची लढाई अत्यंत महत्त्वाची आहे. हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. या मुद्द्यावरून लक्ष हटवून जाणीवपूर्वक अन्य मुद्दे चर्चेत आणले जात आहेत. मनोज जरांगे मुंबईत आल्यानंतर खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणावर लढाई सुरू होईल. ते आपल्या समाजासाठी लढत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी या लढाईकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

जरांगेंबरोबर चर्चा केली पाहिजे

जरांगे मुंबईत येतील तेव्हा त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्राला आंदोलनाची मोठी परंपरा आहे. आंदोलन चुकेल किंवा बरोबर असेल, आंदोलन करण्याचा अधिकार हा नेत्याला आणि त्यांच्या समर्थकांना आहे. सरकारचं काम आहे त्यांचं समाधान करणं, ज्या गोष्टी शक्य आहेत त्या मार्गी लावणं, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्र बहुभाषिक नाही

महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे. मराठी माणसाला जातीपातीमध्ये फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे. मुंबई किंवा महाराष्ट्र बहुभाषिक नाही; मग तुम्ही संपूर्ण देशाच्या बाबतीत असं म्हणायला पाहिजे. त्यांच्यात हिम्मत असेल तर चेन्नईत जाऊन तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात, केरळ, कर्नाटकमध्ये जाऊन ही राज्ये बहुभाषिक आहेत असे म्हणावे, असे आव्हानही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिले.

महाराष्ट्र मराठी माणसाचा व्हावा म्हणून १०६ हुतात्मा झाले

हा महाराष्ट्र मराठी माणसाचा व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. आता केंद्रीय गृहमंत्री पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्रात येते आणि हे राज्य बहुभाषिक असल्याचे म्हणते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये हा महाराष्ट्र बहुरंगी आहे असे सांगण्यात आले, तेव्हा सगळ्यात मोठा उद्रेक झाला होता. पुन्हा एकदा आपण त्या दिशेने चाललो आहोत. सत्ताधारी राज्यकर्ते नाकर्ते आहेत. स्वाभिमानी राज्यकर्ता असता तर महाराष्ट्र काय आहे हे सांगण्याची हिम्मत केली असती. मात्र त्यांच्यात ही हिम्मत नाही. अमित शाह, आम्ही निर्भीडपणे बोलत होतो. आता खोटे गुन्हे आमच्यावर टाका. मराठी भाषेसाठी मी तुरुंगात जायला तयार आहे, असे आव्हान संजय राऊतांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT