ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत. file photo.
मुंबई

Ashok Kharat Controversy | "प्रश्न झाडाला पाणी कोणी दिले याचा नाही..." : अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांनी कोणती मागणी केली?

Ashok Kharat Controversy |दीपक केसरकर हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरातकडे घेऊन गेले

पुढारी वृत्तसेवा

अशोक खरात भोंदूबाबा आहेच, त्याबरोबरच तो मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करत होता. अशोक खरात याच्या संपत्तीबाबत सरकारने उत्तर द्यायला पाहिजे, अशी मागणीही संजय राऊतांनी केली आहे.

Ashok Kharat Controversy

नवी दिल्ली : "भोंदूबाबा अशोक खरात याच्या फार्म हाऊसमधील झाडाला पाणी कोणी दिले हा प्रश्न नाही. त्यानंतर गेल्या वर्षभरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा प्रश्न आहे. महिलांचे शोषण, ब्लॅकमेलिंग आणि धमक्या हा अशोक खरात प्रकरणातील क्रमांक एकचा गुन्हा आहे. भोंदू बाबाच्या चरणाशी जाऊन बसणारे राज्यकर्ते हे त्याच्यापेक्षा मोठे गुन्हेगार आहेत," असा आरोप करत या प्रकरणी दीपक केसरकरांसह एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, रूपाली चाकणकर यांचीही चौकशी करा. अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला याचीही चौकशी करा," अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २९) माध्यमांशी बोलताना केली.

केसरकर हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेऊन खरातकडे गेले

अशोक खरात भोंदूबाबा तर आहेच, त्याबरोबरच तो मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करत होता. अशोक खरात याच्या संपत्तीबाबत सरकारने उत्तर द्यायला पाहिजे, खरात सरकारचा माणूस आहे. त्याच्या पाठीशी ४० आमदार होते. दीपक केसरकर हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरातकडे घेऊन गेले होते. केसरकर शिक्षण मंत्री असताना या खात्यातील बदल्या, बढत्या आणि टेंडर प्रक्रिया ट्रायडेंट हॉटेलमध्ये बसून अशोक खरात ठरवत होता," असा दावा राऊत यांनी केला. "सरकार या भोंदू बाबाच्या पाठीशी नसेल, तर केसरकर, रूपाली चाकणकर आणि एकनाथ शिंदे यांची चौकशी का केली जात नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सरकारमधील मध्यस्थ भोंदूबाबा खरातला प्रतिष्ठा देतोय

"अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातांना कोण घेऊन गेलं? चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला?" असा सवाल करत फोटो कोणी कोणाबरोबर काढू शकतो असं मुख्यमंत्री म्हणतात. "मी मुख्यमंत्र्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे, तरीही माझा प्रश्न आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, अशोक खरातसारखा भोंदू बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचला? सरकारमध्ये कोणीतरी मध्यस्थ आहे, कोणीतरी दलाल आहे जो या सरकारमध्ये या भोंदू बाबाला प्रतिष्ठा देतोय," असा दावाही संजय राऊत यांनी केला.

महिलांचे शोषण हा सर्वात गंभीर गुन्हा

अशोक खरातच्‍या फार्म हाउसवरील झाडाला पाणी कोणी दिले याचा प्रश्न नाही, तर गेल्या वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांचा आहे. महिलांचे शोषण, ब्लॅकमेलिंग आणि धमक्या हा या प्रकरणातील क्रमांक एकचा गुन्हा आहे. भोंदू बाबाच्या चरणाशी जाऊन बसणारे राज्यकर्ते हे त्याच्यापेक्षा मोठे गुन्हेगार आहेत, असेही संजय राऊत म्‍हणाले.

मंत्री कोण होणार हे सुद्धा अशोक खरात ठरवत होता

"महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे आणि तो 'टायगर' किंवा 'तुतारी' असं योग्य वेळी मी जाहीर करेन," असा गौप्यस्फोट ज्योती वाघ यांनी केला आहे. यावर राऊत म्‍हणाले, "ऑपरेशन ठीक आहे करू द्या, पण एक प्रश्न असा आहे की, सरकारमधले जे मंत्री आहेत ते मंत्री होणार हे सुद्धा अशोक खरात ठरवत होता. त्याचा हस्तक्षेप सर्वत्र होता. केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खातं, त्यामधल्या बदल्या, बढत्या, टेंडर हे सगळं अशोक खरात ठरवायचा. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, ट्रायडेंट हॉटेलमध्ये बसून हा सगळा कारभार अशोक खरात करत होता," असा दावाही संजय राऊतांनी केला.

गॅस टंचाईवरून सरकारमध्येच जुंपली

राज्यातील गॅस टंचाईच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आणले. "मुख्यमंत्री म्हणतात की, गॅस टंचाई नाही, पण त्यांचेच मंत्री छगन भुजबळ टंचाई असल्याचे मान्य करतात. अकोल्यात गॅसच्या रांगेत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांना जर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करायची असेल, तर त्यांनी गुजरात सरकारवर गुन्हा दाखल करावा; कारण या रांगा आणि अफवांचा उगम तिथूनच झाला आहे," असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT