Sanjay Raut criticises Amit Shah : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला."आमच्या कार्यकर्त्यांना कशासाठी अटक करताय? अमित शहा यांना कशाची भीती वाटतेय?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटले की, "देशाचे गृहमंत्री निधड्या छातीचे असावेत. ते लडाखमध्ये सोनम वांगचुकला अटक करतात. तुम्हाला वांगचुकची भीती वाटते. आपण गृहमंत्री असाल तर तसे वागा. हा पळपुटेपणा कशाला? भयग्रस्त नेत्यांना राज्य करण्याचा हक्क नाही," अशा शब्दांत त्यांनी आज (दि. ५) केंद्र सरकारवर टीका केली.
"तुम्हाला लडाखमध्ये वांगचुक यांची भीती वाटते. लोकशाहीने सर्वांनाच आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे – मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा सुद्धा.पण सरकारला लोकांचे आंदोलन नको आहे. अटक करून कुठे नेत आहेत, हेही सांगत नाहीत.आपण गृहमंत्री असाल तर तसे वागा. हा पळपुटेपणा कशाला?देवेंद्र फडणवीस देखील असेच वागत आहेत. लोकांना अटक करून तुरुंगात टाकत आहेत," असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
"नवी मुंबई एअरपोर्टचे पूर्ण गुजरातीकरण झाले आहे.यामध्ये नोकरीत मराठी माणसाला स्थान नाही.मनसे आणि शिवसेना मिळून यावर आंदोलन करणार आहेत.राज ठाकरे आणि आमच्यात चर्चा झाली आहे.आमच्या आंदोलनात शेकापही सहभागी होणार आहे," असेही राऊत यांनी सांगितले.
ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आयुष्यभर पदं भोगली, ते आता अत्यंत हीन पातळीवर जाऊन आरोप करत आहेत.रामदास कदम यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याइतके ते महान नाहीत. ते नमकहराम नाहीत तर काय?अशा गद्दारांना जबर किंमत मोजावी लागणार आहे.या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मदतीस येणार नाहीत," असा इशाराही त्यांनी दिला.
"आमदार अनिल परब यांनी केलेले भाष्य अत्यंत गंभीर आहे.रामदास कदम यांच्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.अनिल परब हे सेनेचे नेते आहेत. ते कायद्याचे पंडित आहेत.तुम्ही त्यावर प्रश्न विचारले पाहिजेत. त्यावर संशोधन केले पाहिजे.त्यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही खासदार संजय राऊत यांनी यावेळी केली."