Sanjay Raut Delimitation Bill
मुंबई: "डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे. जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे. ते २१ व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील," असा इशारा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. प्रत्येक देश प्रेमी लोकशाहीवादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.
“इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो; गद्दारी बाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात," असे राऊत यांनी म्हटले आहे. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत, नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा टप्पा बोलावण्याची घोषणा गुरुवारी (दि. २६) केली आहे. या अधिवेशनातच महिला आरक्षण व परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक मंजूर करून घेतले जाणार आहे. केंद्र सरकारने तसा चंग बांधला आहे.
चार दिवसांच्या या अधिवेशनाची सुरुवात सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेच्या कामकाजाने होईल. २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ३ डिसेंबर रोजी या अधिवेशनाची सांगता होईल. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर ही माहिती दिली.
सरकारने अधिवेशनाचा अधिकृत अजेंडा अद्याप जाहीर केला नसला, तरी अधिवेशन बोलावण्याच्या पद्धतीवरून सरकारने घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याची तयारी केल्याचे स्पष्ट होते. हे १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक असेल. ते गोंधळात मंजूर करून घेता येणार नाही; यासाठी सरकारला दोनतृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल. विशेष म्हणजे, परिसीमनदरम्यान लोकसभा किंवा विधानसभेच्या कमाल जागांची मर्यादा वाढवायची असल्यास (उदा., २०२६ मध्ये प्रस्तावित कमाल ८५० जागांची मर्यादा), राज्यांतील जागावाटपावरील घटनात्मक बंदी किंवा कालमर्यादा बदलायची असल्यास किंवा इतर घटनात्मक तरतुदींत सुधारणा करायची असल्यास घटनादुरुस्ती विधेयक (कलम ३६८ अंतर्गत विशेष बहुमताने) आवश्यक असते.