Sanjay Raut on Amit Shah : "निवडणूक आयोगामध्ये सुरू असणारा गदारोळ हा अचानक झालेला नाही. तो सुरूच होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निवडणूक आयोगात बंड होणे ही साधी गोष्ट नाही. आज या देशाचा शत्रू कोण असेल, तर ज्ञानेश कुमार आहेत. हा गृहमंत्र्यांचा शार्प शूटर छोटा शकील आहे. याचा बॉस कोण आहे समजून घ्या," अशा बोचऱ्या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज (दि. २४) केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाताखाली निवडणूक आयोग काम करत आहे. ज्ञानेश कुमार हा अमित शहा यांचा माणूस आहे. माफिया असणाऱ्या या माणसानं निवडणूक आयोगाचा लोकशाहीचा कत्तलखाना केला आहे. हा कत्तलखाना बंद करायचा असेल, तर एकत्र आले पाहिजे."
ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावर राहण्याचा अधिकार नाही. आम्ही त्यांना बडतर्फ करण्यासाठी संसदेत प्रयत्न केले होते; पण त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे पाठबळ आहे. या देशात निवडणूक आयोग राहिलेलाच नाही. राजकीय मतभेद आहेत, म्हणजे १३ कोटी लोकांची नावे वगळणे असे होत नाही, असेही राऊत यांनी नमूद केले.
निवडणूक आयोग हा तीन सदस्यीय आहे. एखाद्या गोष्टीवर असहमती असेल तर ती दुरुस्त व्हावी, यासाठी तीन सदस्यीय आयोग आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी विशेष मतदार नोंदणी तपासणीबाबत १० महिन्यांत १४ वेळा आक्षेप घेतला होता; मात्र याकडे दुर्लक्ष झाले. मुख्य निवडणूक आयुक्त गृहमंत्र्यांचा छोटा शकील आहे. याचा बॉस कोण आहे समजून घ्या, असेही राऊत म्हणाले.
ज्ञानेश कुमार सरकारचे काम करत असल्याने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहारमधील निवडणुका विरोधी पक्ष जिंकू शकले नाहीत. म्हणूनच उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांनी या राज्यांमध्ये पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे, कारण येथे निवडणुका झाल्याच नाहीत. येथील निवडणुकांमध्ये ज्ञानेश कुमार यांनी केलेला अपहार लोकशाहीसाठी घातक आहे. ज्ञानेश कुमार यांनी केलेले पाप हळूहळू समोर येईल, त्यावर खटले दाखल होतील, असेही संजय राऊत म्हणाले.
राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. आता सरकारने शेतकऱ्यांना काय हवे हे पाहिले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या वाऱ्या कमी केल्या पाहिजेत. त्यांनी दुष्काळ पाहणीचा इव्हेंट करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे वागणे बंद केल्यावर शेतकऱ्यांना मदत मिळेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.