मुंबई: देशातील जेन-झीसह सर्व जनता रस्त्यावर उतरली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जाण्याचा मुहूर्त ठरला आहे. एप्रिल २०२७ च्या शेवटच्या आठवड्यात दोघेही सत्तेतून पायउतार होतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
तसेच, ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष आणि चिन्हाची न्यायालयीन सुनावणी पाहता पुढच्या वर्षीच्या दसरा मेळाव्यापर्यंत धनुष्यबाण आपल्याकडे आलेले असेल, असे भाकितही राऊतांनी वर्तविले.
त्याचबरोबर लाॅरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही. अमित शाह हेच बिश्नोई, या देशाचा गृहमंत्री ज्याच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे तोच एक माफिया आहे. फक्त नाव लाॅरेन्स बिश्नोईचे आहे. पण, या देशातील गुंड माफियांची टोळी कोणी चालवत असेल, तर ते अमित शाह हेच आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. देवांच्या हातात शस्त्र असतात मात्र ती आता गुंडांच्या हातात गेली आहेत. आणि अमित शाह-देवेंद्र फडणवीस या गुंडांचे सरदार आहेत, असेही राऊत म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यात संजय राऊत यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तर, शिंदे गटाच्या मेळाव्यावर तोंडसुख घेतले.
एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यावर टीका करताना राऊत म्हणाले, तिकडे विचार नाही, संघर्ष नाही, महाराष्ट्रासाठी, देशासाठी स्वाभिमान असेल कोणती भूमिका नाही, महाराष्ट्र धर्म फक्त इकडे आहे, पुढल्या दसरा मेळाव्याला आपली निशाणी धनुष्यबाण व्यासपीठावर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आम्ही धनुष्यबाण सोडणार नाही, असा इशाराही दिला.
राम मंदिरातील दानपेटी, दागिने अशी १४०० कोटी रुपयांची लूट भाजपच्या काळात झाली, असे राऊत म्हणाले.
मुंबईत नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा संदर्भ देत संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोपांची राळ उडवली. मुंबईत रोज कायदा आणि सुव्यवस्थेचा मुदडा पडत आहे. देशाच्या ज्या गृहमंत्र्यांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, ते गृहमंत्रीच देशातील सगळ्या गुंड-माफियांची टोळी चालवत आहेत.
मेळाव्यात आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर सरकार मीठ चोळत असल्याची टीका करताना दुष्काळाच्या काळात केल्या जाणाऱ्या उपाययोजना फोल असल्याचा आरोप केला. तर, मेळाव्यात शिवसैनिकांनी ठाण्यातील कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर यांना न्याय देण्याचे पोस्टर झळकावले.
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली - नितीन बानुगडे-पाटील
राज्यात १ हजार ९८७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. पण, दिवाळीच्या तोंडावर पाच हजार रूपये देत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका नितीन बानुगडे-पाटील यांनी केली.
'शिकून मोठे व्हा'च्या जागी 'विकून मोठे व्हा' हा भलताच पॅटर्न सरकारने सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या पोरांनी जमिनी विकावे म्हणजे यांचे महामार्ग तयार होतील, असा टोला त्यांनी लगावला.
चारा छावण्यांच्या नावाखाली दलाली - अंधारे
गेल्या १५० वर्षांत दिसला नव्हता तसा दुष्काळ दिसत आहे. १९७२ ला सुध्दा अशी परिस्थिती नव्हती असे जुनेजाणते सांगत आहेत. चारा छावणीच्या नावाखाली दलाली सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात केला.
राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट होत असून गेल्या बैलपोळ्याच्या दिवशी मराठवाड्यात ४८ आत्महत्या झाल्या. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सगळ्यांना काटकसरीचा सल्ला देत आहेत, पण भाजपचे नेते उधळपट्टी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असा दावा त्यांच्या समर्थकांपासून केला जात आहे.
पण, ज्या नेत्याला पुणे शिक्षक मतदारसंघातील आपला अर्ज राखता आला नाही तो काय मुख्यमंत्री होणार, असा टोलाही अंधारे यांनी लगावला. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या चौकशीचे काय झाले. शिवसेना उबाठा नेता प्रदीप पुर्णेकर यांची ठाण्यात हत्या झाली, त्याचा आरोप असलेल्या मिनाक्षी शिंदे यांना पोलिसांचे संरक्षण असल्याची टीका त्यांनी केली.