मुंबई : संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशनप्रसंगी खा. शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार साकेत गोखले, ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर आदी. (Pudhari Photo)
मुंबई

Mumbai News | सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात डांबणे लोकशाही नव्हे

Sanjay Raut Book | संजय राऊत लिखित ‘नरकातला स्वर्ग’ प्रकाशनप्रसंगी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut Book

मुंबई : सत्ता आहे म्हणून त्याचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या लोकांना तुरुंगात डांबणे ही लोकशाही नाही, तर ठोकशाही आहे. याविरोधात एकत्र येणे काळाची गरज आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार व ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधार्‍यांवर टीका केली.

खासदार संजय राऊत लिखित ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचे प्रकाशन रवींद्र नाट्यमंदिरात शनिवारी झाले. त्या वेळी उभयनेते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे, जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, भास्कर जाधव, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते.

उपकारांची फेड कृतज्ञ नीतीने करायची की अपकाराने करायची हे ज्याच्या त्याच्यावर असते. कोणाला मदत करताना असा विचार आपण करू शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शरद पवार म्हणाले, अनिल देशमुखांवर एका शासकीय अधिकार्‍याने जी तक्रार केली होती, ती 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाची होती. शेवटी न्यायालयात ही केस उभी राहिली तेव्हा 1 कोटीचा भ्रष्टाचार केला, असा आरोप त्यांच्यावर झाला; पण ही सगळी मंडळी नमली नाहीत. संकटातून बाहेर कसे निघता येईल याचा विचार त्यांनी केला.

महाराष्ट्र झुकणार नाही आणि वाकणारही नाही. हा मर्दांचा महाराष्ट्र आहे, असे संजय राऊत म्हणाले. तृणमूलचे खासदार साकेत गोखले यांनीही त्यांनी इमान विकले नाही, ते जेलमध्ये गेले आणि ज्यांनी विकले ते उपमुख्यमंत्री झाले, असा हल्लाबोल केला.

समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर म्हणाले, मुंबईत मला तीन वेळा मुल्लांच्या धमक्यांमुळे संरक्षण दिले गेले. दोन्ही बाजूचे कंट्टरपंथीय मला शिव्या घालतात. एक म्हणतात तू काफीर आहेस, नरकात जाशील. दूसरे म्हणतात, तू जिहादी, पाकिस्तानला निघून जा. आता मला पाकिस्तान आणि नरक असे पर्याय दिले, तर मी नरकाचा पर्याय निवडेन.

पीएमएलए कायद्यात दुरुस्तीची गरज- शरद पवार

पीएमएलए कायद्यात बदल करण्याची गरज असून देशात परिवर्तन झाल्यावर हे काम प्राधान्याने केले जाईल, असे सांगून पवार म्हणाले, न्यायव्यवस्थेनेही या घटनांकडे गंभीरपणे बघायला हवे.ईडीला मिळालेल्या शक्तीमुळे ईच्छा असूनही न्यायव्यवस्थेला मर्यादा जाणवते. यावरून परिस्थितीत बदलाची किती गरज आहे, हे अधोरेखित होते. केंद्रीय मंत्रिमंडळात ईडीला अटकेसह विविध अधिकार बहाल करणा-या दुरूस्त्या जेव्हा पैशाची अफरातफर प्रतिबंधक (पीएमलए) कायद्यात प्रस्तावित करण्यात आल्या तेव्हा मी या सुधारणांना विरोध केला होता. हे अधिकार ईडीला देऊ नका, असे मी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सुचविले होते. ईडीने आरोपी दोषी आहे हे सिध्द करण्याऐवजी आपण निर्दोष आहोत हे सिध्द करण्याची जबाबदारी आरोपींवर सोपविणा-या दुरूस्तीला मी विरोध करीत असतानाही त्या मंजूर करण्यात आल्या. या नव्या दुरूस्त्यांनंतर विरोधकांना लक्ष्य केले जाईल, अशी शंका मी व्यक्त केली. आणि झालेही तसेच. पहिली अटक माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनाच झाली, अशी आठवण पवारांनी यावेळी सांगितली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT