Sanjay Raut on Gaushala corruption  Pudhari
मुंबई

Sanjay Raut : भाजपने मृत गायींवरही अनुदान घेतले, गोशाळा अनुदानात ३५० कोटींचा भ्रष्टाचार : संजय राऊतांचा गंभीर आरोप

खासदार विनायक राऊतांवरील आरोपांबाबत थोडा संशय वाटतो

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on Gaushala corruption : "धर्माच्या नावाखाली भाजपकडून लूट सुरू आहे. राजस्थानमध्ये गोशाळांच्या अनुदानात ३५० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. मृत गाईंवर यांनी अनुदान घेतलं. मृत गोमातेच्या टाळूवरचं लोणी भाजपचे लोक खात आहेत," असा गंभीर आरोप करत, "धर्माच्या नावाखाली लूट सुरू असताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे काय करत आहेत?" असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

नाशिकमधील सर्व कामे गुजरातच्या ठेकेदारांना

नाशिकमधील तपोवनात वृक्षतोड करण्यात आली. प्रभू श्रीरामांचे वास्तव्य तिथे झाले होते. पर्यावरणप्रेमींनी तिथे आंदोलन केले, तरीही बेफाम पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने गिरीश महाजन यांनी वृक्षतोड केली आहे. शतकातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहे. सगळे गुजरातचे ठेकेदार आहेत, त्यांनाच सर्व कामे देण्यात आली आहेत, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

... तर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जातील

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, अधूनमधून ते विधानभवनात हिंदीत भाषण करत असले तरी महाराष्ट्रात मराठीच चालेल. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मनात थोडी जरी मराठी भावना जागृत असेल तर ते कारवाई करतील. नरेंद्र मोदी यांना वाटत असेल की केंद्रात देवेंद्र फडणवीस योग्य आहेत, तर नक्कीच त्यांना दिल्लीत घेतले जाईल, महाराष्ट्र त्यांच्या हातात राहणार नाही. आता महाराष्ट्र गुंडांचे राज्य झाले आहे, फडणवीस दिल्लीत जातील, असे भाकीतही राऊतांनी केले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत

"राज्यात भाजपचा मुख्यमंत्री राहील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत. एकनाथ शिंदे भाजपमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की भाजपची स्थापना मी केली आहे, देवेंद्र फडणवीस माझे कार्यकर्ते आहेत, तर हे होऊ शकेल," असा टोला त्यांनी लगावला. "नरेंद्र मोदी परदेशात फिरत आहेत. तुम्ही इतिहास पाहिला तर लक्षात येईल, हिटलर आणि ईदी अमीन यांच्या ड्रेसवर खूप सारे मेडल असायचे. त्यांचा काय इतिहास आहे हे तुम्हाला माहितीच आहे," अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

विनायक राऊतांवरील आरोपांबाबत थोडा संशय

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, "याबाबत माझ्याकडे माहिती नाही. गुन्हा ठाण्यात नोंद झाला आहे, त्यामुळे मला थोडा संशय वाटतो आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT