Sanjay Raut VVPAT Election Commission Attack :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज निवडणूक आयोगाच्या कामकाजावर थेट हल्ला चढवला आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘बोगस’ आणि ‘डुप्लिकेट मतं’ असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई आणि ठाण्यातही अशा मतांची संख्या लक्षणीय असल्याचा दावा केला. साधारणपणे साडेतीन लाख ते चार लाख डुप्लिकेट मतदारांमुळं २५ वॉर्डांचं चित्र बदलू शकतं. संपूर्ण निवडणूक फिरवली जाऊ शकते असा धक्कादायक दावा देखील त्यांनी केला.
राऊत म्हणाले, 'लाख मतं ही डुप्लिकेट, साडेतीन लाख मतं डुप्लिकेट आहेत. नाशिकसारख्या ठिकाणी ही मतं २५ वॉर्डात फिरवली तर निवडणूक फिरते.'
त्यांनी थेट आकडेवारी देत सांगितले की, 'मुंबई, ठाण्यात राज्यातील प्रत्येक ठिकाणी सुमारे साडेतीन लाख ते चार लाख डुप्लिकेट मतं आहेत, बोगस आहेत. हे लोकं दोन-दोन, तीन-तीन ठिकाणी मतदान करतात.' अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने पारदर्शक पद्धतीने काम करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मतदान प्रक्रियेत पारदर्शकतेच्या मुद्यावरून त्यांनी VVPAT (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) च्या वापरावरूनही आयोगाला लक्ष्य केले. 'मुंबईत व्हीव्हीपॅट का नाही? व्हीव्हीपॅटबाबत सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे. मग मुंबई महानगरपालिकेत व्हीव्हीपॅट का नाही?'
यावर निवडणूक आयोगाने 'केंद्राकडून त्या पद्धतीचे मशीन दिल्या नाहीत' असे उत्तर दिल्याचे राऊत यांनी सांगितले. हे उत्तर फेटाळत त्यांनी थेट आरोप केला की, 'हे काय उत्तर आहे का? म्हणजेच तुम्हाला चोऱ्या करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला फ्रॉड करायचाय.' असे अनेक विषय आहेत असंही ते म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता आणि बोगस मतदानाचे मुद्दे आयोगासमोर मांडण्यासाठी महाविकास आघाडी (MVA) आणि मित्रपक्षांचे शिष्टमंडळ आज भेटणार आहे.
'भारताचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, मोहसीन खान, वर्षा गायकवाड असे सर्व प्रमुख लोकं एकत्र येऊन निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहोत.'
'त्यांना आम्ही दाखवू की तुम्ही निवडणुकीचा जोक केला आहे. मते वाढतात कशी यामागं कोण पडद्यामागं काम करतंय इतकं बोगस मतदान या देशात कधी झालं नाही,' असा इशारा राऊत यांनी दिला.
राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत या बोगस मतदानाचा फटका बसला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला ‘जागरूक’ राहावे लागणार आहे.