Sanjay Raut On Raj Thackeray: राऊतांनी राज ठाकरेंच्या मविआ प्रवेशावारून थेट फडणवीसांनाच मधे खेचलं... काल हात पोळले आज घेतला सावध पवित्रा
Sanjay Raut on Raj Thackeray MVA Entry :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील (MVA) संभाव्य समावेशाबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज मोठे आणि सूचक वक्तव्य केले. निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी बोलावलेले शिष्टमंडळ हा राज ठाकरे यांच्या MVA प्रवेशाचा मुद्दा नाही, असे स्पष्ट केलं. त्याचबरोबर त्यांनी फडणवीसांचं देखील उदाहरण दिलं.
काल संजय राऊत यांच्या राज ठाकरेंची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा असल्याच्या वक्तव्यावरून रणकंदन माजलं होतं. काल हात पोळल्यावर आज पत्रकार परिषदेत राऊतांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसलं.
निवडणूक आयोगाच्या भेटीवर स्पष्टीकरण
राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळात निमंत्रित करण्यामुळे ते महाविकास आघाडीत सामील होतील का, या प्रश्नावर राऊत म्हणाले, "असं काही नाही. जर आम्ही देवेंद्र फडणवीस यांना (शिष्टमंडळात) बोलावले तर काय ते महाविकास आघाडीत सामील झाले का?"
हे शिष्टमंडळ सर्वांसाठी खुले आहे. राज ठाकरे यांच्याबाबतचा निर्णय त्यांना विचारला पाहिजे, आमचा संबंध केवळ शिष्टमंडळ नेण्यापुरता आहे.
अमित शहांच्या कंपन्या
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला आम्ही पक्षच मानत नाही असं म्हणत शिंदे गट आणि अजितदादांचा गट हा अमित शहाच्या कंपन्या आहे असं म्हटलं. निवडणूक आयोगाने त्यांना बेकायदेशीरपणे पक्ष म्हटले असले तरी आम्ही ते मानत नाही. शिष्टमंडळात सामील न होण्यामागे त्यांची चोरी पकडली जाईल, ही भीती आहे, त्यामुळे ते यायला तयार नाहीत, अशी टीका राऊतांनी केली.
शिष्टमंडळात दोन पक्षांना (शिंदे गट आणि अजित पवार गट) का बोलावले नाही, याबद्दल त्यांनी स्पष्ट केले की, "त्यांच्यासोबत इतर जे दोन पक्ष आहेत, त्यांना आम्ही निमंत्रित केले नाही, कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही."
काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह
राज ठाकरे यांच्या समावेशाबद्दल काँग्रेसमध्ये मतभेद आहेत, या प्रश्नावर राऊतांनी स्पष्ट केले की, "हा ठरवण्याचा निर्णय काँग्रेसकडे नाही. शिष्टमंडळाबाबतचा निर्णय हा सर्व मिळून घेतात.
ते पुढे म्हणाले, "मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे. यावर राजकारण व्हावे असे मला वाटत नाही. शिष्टमंडळात सर्वजण असावे,"
नोबेल पुरस्कारावरून भाजपला सल्ला
शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कॉरिना मचाडो यांना मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
"शांततेचा नोबेल पुरस्कार एका विरोधी पक्षनेत्याला देण्यात आला आहे. याचा विचार देशातील संघवाद्यांनी आणि भाजपने केला पाहिजे. तिथे सुद्धा भारताप्रमाणे हुकूमशाही आहे. मारिया मचाडो हुकूमशाहीविरुद्ध लढत आहेत. भारतामध्येही आम्ही तेच करतो आहोत, महाराष्ट्रातही आम्ही तेच करतोय." राऊत म्हणाले, "मारिया यांचा आदर्श ठेवला तर भारतातील किमान ५०० लोकांना नोबेल द्यावा लागेल."

