Sanjay Raut on election campaign
मुंबई : "महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी (दि. १३) संपला आहे. निवडणूक आयोगाने सत्ताधार्यांना एक वेगळी मुदत दिली आहे. आता जाहीर प्रचार संपला असला तरी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सवलतीमुळे आता उमेदवार मतदारांना घरोघरी जावून भेटू शकतात. घरोघर पैशाचा वाटप करण्यात येत आहे. साडी वाटप करण्यात येत आहे. प्रचार संपला; पण आता काही तरी वेगळे सुरु," असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. १४) माध्यमांशी बोलताना केला.
संजय राऊत म्हणाले की, "महानगरपालिकेचा जाहीर प्रचार मंगळवारी संपला आहे, मात्र निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना जणू काही वेगळीच मुदत दिली आहे, असे वाटते. सध्या आचारसंहितेचा उघडपणे भंग होत असून आयोग त्याकडे डोळेझाक करत आहे.शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाकडे घोटाळ्याचे पैसे आहेत. सध्या घरोघरी जाऊन पैशांचे आणि साड्यांचे वाटप केले जात आहे."
सोमवारी शिवतीर्थावरील झालेल्या सभेत सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ठाकरेंनी मराठी माणसासाठी वडापावच्या गाडीशिवाय दुसरं स्वप्नच पाहिले नाही,” असा टोला लगावला होता. "वडापाव हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे, त्याची खिल्ली उडवू नका. तुम्ही दिल्लीत 'अटल हॉटेल' उघडले होते, त्याचे काय झाले? ते तर बंद पडले, मग आता वडापावच्या नावाने तुमच्या पोटात का दुखतेय?", अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी वडापावबाबत केलेल्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला.
अजित पवार यांच्याकडे कसली फाईल आली आहे? असा प्रश्न विचारत राऊत म्हणाले की, "अजित पवार आणि गणेश नाईक यांच्याकडे महाराष्ट्राच्या हिताची काही माहिती असेल, तर ती जनतेसमोर उघड करा. फडणवीसांनी ही फाईल लपवू नये." "आज मकरसंक्रांत आहे, अजित पवारांच्या तोंडात तरी गोड पडो. विरोधकांनाही शुभेच्छा, तिळगुळ घ्या आणि गोड बोला.", अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धमकावत असल्याचा आरोप राऊतांनी केला. "आम्हाला सोडून दुसरीकडे गेलात तर काय होऊ शकते, असा इशारा फडणवीस देत आहेत," असा दावाही त्यांनी केला.
राज्यातील महानगरपालिका निवडणूक हिंदू-मुस्लिम अशी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये भाजपचा हा डाव फसला, तसाच तो महाराष्ट्रातही सपशेल फेल होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. तसेच जर कोणी दुबार मतदान करताना सापडला, तर त्याला ठोका, या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या आवाहनाचा पुन्नरुच्चारही त्यांनी केला. आज प्रचाराच्या गदारोळानंतर आशीर्वाद घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.