Mumbai Local Train Sandhurst Road Station Accident
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकल सेवेचा खोळंबा झाला असतानाच दुसरीकडे सँडहर्स्ट रोड येथे भीषण रेल्वे दुर्घटना घडली. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे ट्रॅकवरून चालणाऱ्या चार प्रवाशांना लोकल ट्रेनने धडक दिली असून यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबईत गुरुवारी संध्याकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. जूनमधील मुंब्रा दुर्घटनेत दोघा अभियंत्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचारी आक्रमक झाले. या अभियंत्यांवरील गुन्हे मागे घ्यावे अशी रेल्वे कर्मचारी संघटनांची मागणी आहे. या आंदोलनामुळे सीएसएमटी, दादर, ठाणे अशा विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
या आंदोलनामुळे मध्य रेल्वेवरील लोकल सेवा ठप्प पडली होती. संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास रेल्वे सेवा पूर्ववत झाली. लोकल सेवा बंद असल्याने प्रवासी रेल्वे रुळावरून चालत इच्छितस्थळ गाठत होते. सँडहर्स्ट रोड येथे मुंबई सीएसएमटीवरून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनने ट्रॅकवरून चालणाऱ्या चार प्रवाशांना धडक दिली. यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी दिली.
दोन प्रवाशांचा मृत्यू
लोकल ट्रेनच्या धडकेत चार प्रवासी जखमी झाले होते. यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप रेल्वे प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.
आश्वासनानंतर आंदोलकांची माघार
आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याचे आमचे प्रयत्न सुरू होते. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे गाड्या लवकरात लवकर सुरू करण्याचे आमचे प्रयत्न होते. कर्मचाऱ्यांसाठी दोन अभियंत्यावरील दाखल झालेले गुन्हे हा कळीचा मुद्दा होता. या गुन्ह्यांवर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिल्यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले, असंही निला यांनी सांगितले.
जबाबदारी कोणाची?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. अभियंत्यांवरील गुन्हे मागे घ्यावी अशी त्यांची मागणी होती. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी हे आंदोलन करण्यात आल्याने प्रवाशांची अतोनात हाल झाले. सहा महिन्यांपूर्वीच्या रेल्वे दुर्घटनेसाठी पुन्हा प्रवाशांनाच वेठीस धरल्याने संताप व्यक्त होत आहे. दोन प्रवाशांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची, या प्रकरणी कोणावर कारवाई होणार असा प्रश्न आता प्रवासी विचारत आहेत.