Expressway Project
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. गुरुवारी दि. 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
नागपूर ते मुंबई असा 701 किमीचा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसर्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा 82 किमीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तिसर्या टप्प्यात भरवीर ते इगतपुरी या 23 किमीच्या टप्प्यातही वाहनांचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे नागपूरपासून थेट इगतपुरीपर्यंत प्रवास करणे शक्य झाले आहे.
इगतपुरी ते आमणे हा शेवटचा 76 किमीचा टप्पा सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्याचे नियोजन होते; मात्र आमणेपासून मुंबई-नाशिक हायवेपर्यंत जोडरस्ता बांधण्याचे काम रखडले.
आमणे ते मुंबई-नाशिक हायवे या 6 किमीच्या जोडरस्त्यामुळे समृद्धी महामार्गावरून मुंबई-नाशिक हायवेवर येणे शक्य होणार आहे. जोडरस्त्यासह इतर किरकोळ कामे 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आली.