मुंबई : राजेश सावंत
2017 च्या महापालिका निवडणुकीत 4.87 टक्के मते मिळवून महापालिकेत सहा नगरसेवक पाठवणाऱ्या समाजवादी पार्टीची भूमिकाही मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत तितकीच महत्त्वाची राहणार आहे. मात्र आघाडीत सहभागी होण्याची चर्चा सुरू असताना मनसेच्या सहभागामुळे समाजवादी पार्टीही आघाडीत जाण्यास फारशी उत्सुक नसल्याचे दिसून येते.
उत्तर प्रदेशमध्ये या पक्षाचे प्रमुख नेते हिंदू असले तरी मुंबईमध्ये समाजवादी पक्ष मुस्लिमांचा पक्ष म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे बहुतांश मुस्लिम मतदार समाजवादीच्या पारड्यात मते टाकतात. मुंबई शहरात नागपाडा, आग्रीपाडा, भायखळा, भेंडी बाजार, महम्मद अली रोड, बांद्रा पूर्व, कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी पश्चिम, यारी रोड, मालवणी आदी भागात समाजवादी पार्टीची मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.
1997 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पार्टीचे 21 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 2002 नंतर पक्षाला थोडी उतरती कळा लागली. परंतु 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 4.87 टक्के मते मिळवून त्यांचे सहा नगरसेवक निवडून आले होते. मतांची ही टक्केवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आताच्या मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पार्टीकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.
भाजप व शिवसेना युतीला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर, समाजवादी पार्टीलाही आघाडीत सहभागी करून घ्यावे लागणार आहे. यासाठी आघाडीतील नेते प्रयत्नशील आहेत. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे समाजवादी पार्टी आघाडीत जाण्यास फारसी उत्सुक दिसत नाही. मुंबईतील सपाचे मतदार नाराज होतील अशी भीती पदाधिकारी व्यक्त करीत आहे.
मनसे नसेल तर आम्ही येऊ
मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडीमध्ये मनसे नसेल तरच आम्ही तुमच्यासोबत येऊ असा निरोपच समाजवादी पार्टीच्या नेत्यांकडून आघाडीच्या नेत्यांना धाडल्याचे समजते. समाजवादी पार्टीच्या अनेक नेत्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली टीका, सपाची मुंबईतील नेते आमदार अबू आझमी यांचा राज ठाकरे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेला वेळोवेळी अपमान यामुळे मनसेच्या खांद्याला खांदा लावून एकत्रित निवडणूक लढवल्यास याचा मोठा फटका बसू शकतो असे मत सपाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.