Open Manhole Accident pudhari photo
मुंबई

Open Manhole Accident : मॅनहोल दुर्घटनेत तिघांवर गुन्हा दाखल

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : साकीनाक्याच्या खैरानी रोडवर गुरुवारी मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू झाल्यानंतर साकीनाका पोलिसांनी कंत्राटदार आणि तीन जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून, तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती.

असलम शेख हे साकीनाक्याच्या यादव नगर मध्ये राहत होते. गुरुवारी दुपारी ते कामावरून परत घरी जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये ते पडले. शेख याना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने मॅनहोलमध्ये शिडी उतरवली. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शोध कार्यात अडथळा आला. त्यानंतर शेख याचा मृतदेह आढळला.

साकीनाका पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. एका फुटेज मध्ये हा सर्व प्रकार स्पष्ट दिसतो. घटनास्थळी ड्रेनेजची दुरुस्ती सुरू असताना कंत्राटदाराने उघड्या मॅनहोलभोवती कोणतेही बॅरिकेट्स लावले नव्हते. त्या ठिकाणी काही जण काम करत असल्याचे फुटेज मध्ये दिसले.

नेमकी घटना जाणून घेण्यासाठी पोलिसांनी पालिका अधिकाऱ्याशी देखील चर्चा केली. शेख याच्या मृत्यू प्रकरणी साकीनाका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) निष्काळजीपणे मृत्यू घडवून आणणे) ३ (५) समान उद्देशाने कृती करणे) या कलमा खाली गुन्हा नोंद केला. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर कंत्राटदाराला शोधण्यासाठी पोलिसांची पथक ठीकठिकाणी तैनात केली आहे.

विशेष म्हणजे कंत्राटदाराविरुद्ध तक्रार देण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले होते. शुक्रवारपर्यंत तरी अशी तक्रार पोलिसांत दाखल झालेली नव्‍हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT