Mumbai News Pudhari
मुंबई

Mumbai News: गुजरातमधील ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची कारवाई

दोघांना अटक, 75 कोटींचा माल जप्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गुजरातमधील एका एमडी ड्रग्ज बनविण्याच्या कारखान्याचा साकीनाका पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी मुस्कान समीर खान या महिलेसह वझुल कमर अब्दुल वफा चौधरी ऊर्फ पप्पू या दोघांना अटक केली असून सुमारे 75 कोटींचे एमडी, ड्रग्ज बनविणसाठी लागणाऱ्या विविध केमिकलसह इतर साहित्य जप्त केले आहे.

या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वीही साकिनाका पोलिसांनी अशाच प्रकारे एमडी ड्रग्जचा पर्दाफाश केला होता. 21 मे रोजी साकीनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर मुस्कान खान या महिलेस अटक केली होती.

मुस्कान ही साकीनाका परिसरात राहत असून ओला-उबरमध्ये चालक म्हणून काम करत होती. तिच्याकडे पोलिसांना वीस लाख रुपयांचे 101 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. तिच्या चौकशीतून वझुल चौधरी याचे नाव समोर आले होते.

त्यानंतर या पथकाने 26 मे रोजी शिळफाटा परिसरातून वझुलला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच मुस्कानला एमडी ड्रग्ज विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली. ते ड्रग्ज त्याने गुजरात येथून आणले होते.

मुस्कान आणि वझुल यांच्याविरुद्ध कारवाई केल्यानंतर अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. सध्या ते दोघेही न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

भाड्याच्या फ्लॅटमध्ये ड्रग्जनिर्मिती!

गुजरातच्या नर्मदा जिल्हा, नांदोद-राजपिलला तालुक्याच्या वरखड परिसरात आरोपींनी एक फ्लॅट भाड्याने घेतला असून तिथेच एमडी ड्रग्ज बनविले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळाहून 74 कोटी 46 लाख रुपयांचे 20 किलो 400 ग्रॅम वजनाचे द्रव्यरुपी एमडीसह 2 ब्रोमो.

4 मेथिलानिलिन, 4 मेथिलप्रोपिपोफेनोन, मोनोमेथिलामाईन, क्लोरोफॉर्म, ब्रोमीन केमिकल, तीन स्टेरर मशीन, कमर्शियल फ्रिज, प्रत्येकी 50 हजार रुपयांचे पाच गोलाकार फ्लॅक आणि हिटींग मेटल असा एकूण 74 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT