साकीनाका: साकीनाका खैरानी रोडवर पावसाळा असल्याने मॅनहोल कामासाठी महानगरपालिकेने वर्क ॲार्डर दिलेली नव्हती अशी माहिती समोर येत आहे. तसेच, कंत्राटदाराने महानगरपालिका अधिकारी वा मुकादमांना २ जुलैला काम करणार असल्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती.
कोणीही मॅनहोल ओपन करणार असल्यास महानगरपालिकेस त्याची पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. परंतु कंत्राटदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर मॅनहोल ओपन केल्याने अपघात होऊन अस्लम शेख यांचा दुर्दैवी अंत झाला होता.
सदर ठिकाणी मॅनहोल ओपन करण्यासाठी कंत्राटदाराच्या फॅब्रीकेटरकडून सुरक्षा नियमांचे कोणतेही पालन केले गेले नाही व व्यवस्थित बॅरीकेडींग न करता परस्पर मॅनहोल ओपन करण्याचा निष्काळजीपणा केला गेला.
कंत्राटदाराने महानगरपालिकेस पूर्वकल्पना दिली असती तर तातडीची बाब म्हणून त्याठिकाणी महानगरपालिकेचा मुकादम कर्मचारी उभा राहिला असता. परंतु हा सर्व प्रकार परस्पर केला गेल्याचे निदर्शनास येताच कंत्राटदारावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पावसाळा असल्याने मॅनहोल ओपन करण्याची कोणतीही सूचना विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली नव्हती. तरीदेखील या घटनेचा दोष अधिकारी-अभियंत्यांच्या माथी मारण्याचा प्रकार सुरू असल्याने व कोणतीही चौकशी न करता थेटपणे त्यांना निलंबित केले गेल्याने अधिकारी व अभियंत्यामध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
राजकीय दबावातून निलंबन झाल्याने महानगरपालिकेतील सर्व संघटनांनी एकत्र येऊन या प्रकाराचा विरोध महापालिका आयुक्तांकडे नोंदवला आहे. विशेषतः, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी परीक्षा घेऊन दोन वर्षे झाली परंतु, परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही.
परिणामी कनिष्ठ अभियंत्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ड्रेनेज व्यवस्थेवर काम करणारे ड्रेनेज असिस्टंट, मुकादम व ड्रेनेज कामगारांची जवळपास ६०% हून अधिक पदे रिक्त आहेत. त्याचा थेट परिणाम दैनंदिन कामांवर होत आहे.
निलंबनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करून काम करून घेण्याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचा कल वाढल्याने महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. महापालिकेच्या ड्रेनेज खात्यातील कनिष्ठ अभियंते, डिए, मुकादम व कामगारांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी भावना बहुतेक कर्मचारी व्यक्त करत आहेत.