मुंबई: आयआयटी-बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी तपासाला वेग आला असून, मुंबई गुन्हे शाखेने आयआयटी-बॉम्बेचे संचालक शिरीष केदारे यांची तब्बल १० तास चौकशी केली.
साहिलच्या कुटुंबीयांनी केलेले जातीय भेदभावाचे आरोप, परीक्षेदरम्यान चॅटजीपीटीचा कथित वापर, त्यानंतर संस्थेने केलेली कारवाई आणि परीक्षेतील गैरप्रकाराबाबतची निर्धारित प्रक्रिया याबाबत केदारे यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली.
साहिलच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीत आयआयटी प्रशासनातील काही व्यक्तींवर जातीय भेदभाव, मानसिक छळ आणि दबावाचे आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा संस्थेतील निर्णयप्रक्रिया आणि साहिलशी संबंधित घटनाक्रमाची स्वतंत्रपणे पडताळणी करीत आहे.
१८ सप्टेंबर रोजी मध्यावधी परीक्षेदरम्यान साहिल मोबाइलचा वापर करून चॅटजीपीटीच्या मदतीने प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आयआयटीच्या निदर्शनास आले होते.
त्यानंतर त्याच्यावर संस्थेने नेमकी कोणती प्रक्रिया राबवली, त्याला परीक्षागृहातून बाहेर काढल्यानंतर कोणत्या अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले आणि या प्रकरणाची नोंद कशी करण्यात आली, याची माहिती पोलिसांनी घेतली.
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर रोखण्यासाठी आयआयटीची निर्धारित कार्यपद्धती काय आहे आणि साहिलच्या बाबतीत तिचे पालन झाले का, याचाही तपास सुरू आहे.
परीक्षेतील कथित गैरप्रकारानंतर साहिलकडून माफीनामा किंवा लेखी स्पष्टीकरण लिहून घेण्यात आले होते का, याचाही तपास गुन्हे शाखा करीत आहे. हा मजकूर कोणाच्या सांगण्यावरून लिहिला गेला, त्यावेळी साहिलवर कोणताही दबाव होता का आणि संस्थेच्या नियमांनुसार अशी प्रक्रिया अपेक्षित होती का, याची पडताळणी केली जात आहे.
यापूर्वी साहिलशी संबंधित प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचीही सुमारे आठ ते दहा तास चौकशी करण्यात आली. डुल्ला यांनी साहिलशी जातीय भेदभाव केल्याचा आरोप फेटाळून लावला असून, विद्यार्थ्याशी संबंधित कारवाई करताना संस्थेच्या नियमांचे पालन केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
साहिलच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयआयटी प्रशासनाने डुल्ला यांना रजेवर पाठवले असून, त्यांच्या प्रशासकीय जबाबदारीतही बदल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणात आतापर्यंत ४० हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत.