मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांवरून आंदोलन सुरू असतानाच काँग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री साहिलच्या आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. सुमारे १७ मिनिटे झालेल्या या संभाषणत त्यांनी पालकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. साहिलच्या मृत्यूपूर्वची परिस्थिती, संबंधित पार्श्वभूमी तसेच विद्यार्थयाला यापूर्वी कोणत्याही प्रकारचा त्रास झाला होता का, याबाबतीत गांधी यांनी कुटुंबांकडून माहिती घेतली.
राहुल गांधी यांनी साहिलच्या आई-वडिलांशी स्वतंत्रपणे संवाद साधल्यानंतर कुटुंबांचे वकील ॲड. निखिल कांबळे यांच्याशीही चर्चा केली. साहिलने आपल्या अडचणींबाबत कोणाकडे काही सांगितले होते का, त्याला मानसिक अथवा अन्य प्रकारचा त्रास झाला होता का आणि संबंधित प्राध्यापकाची पूर्वीची पार्श्वभूमी काय आहे, याबाबतीत त्यांनी माहिती घेतल्याचे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
मात्र, अशा कोणत्याही बाबींची आपल्याला माहिती नसल्याचे पालकांनी गांधी यांना सांगितले. साहिलचा मोबाईल सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यावर मोबाईलमधील दूरध्वनीवरील संभाषणांची नोंद तसेच अन्य तपशील तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात, असे गांधी यांनी सांगितले. याबाबतीत पोलिसांकडे मागणी करण्याचा सल्ला त्यांनी ॲड. कांबळे यांना दिला. तसेच आपल्या कायदेशीर पथकाकडून वकिलांच्या संपर्कात राहून आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे समजते.
साहिलचे पालक आयआयटीमध्ये येऊन उपोषण करणार असल्याची माहिती असल्याने सकाळपासूनच मुंबई काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय आणि भीम आर्मीचे कार्यकर्ते प्रवेशद्वारावर जमा होते. आंदोलक सह्याद्री अतिथीगृह व आझाद मैदानाकडे गेल्याने प्रवेशद्वारावरील गर्दी दुपारनंतर कमी झाली.
साहिलने गेल्या शुक्रवारी आयआयटी मुंबईत आत्महत्या केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याच रात्री कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू केले होते. प्रशासनासमोर विद्यार्थ्यांनी १८ मागण्या मांडल्या. त्यावर चर्चा झाल्यानंतर काही मुद्द्यांवर तोडगा निघाल्याने कॅम्पसमधील आंदोलन मागे पडले.
मात्र, बाहेरील राजकीय आणि विद्यार्थी संघटनांनी साहिलला कथित जातीयवाचक शेरेबाजीचा सामना करावा लागल्याच्या आरोपावरून आंदोलन सुरू ठेवले आहे.
एनएसयूआय आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनीही आयआयटीच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करत आंदोलन केले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेऊन आंदोलनस्थळापासून दूर केले. दुपारनंतर साहिलच्या पालकांचे आंदोलन आझाद मैदानाकडे वळल्याने आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले.